
नवी दिल्ली : फुटबॉलचे जादूगर म्हणून पेले यांची ओळख होती. तीन वर्ल्डकप, ७८४ गोल आणि जगभरात फुटबॉल प्रेमींसाठी पेले हे एक प्रेरणा स्त्रोत होते. फुटबॉलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीची महान गाथा मागे सोडत त्यांनी जगाचा निरोप घेतला. पेले यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीत एकूण १२०० हून अधिक गोल केले. पण फीफाने ७८४ गोलनाच मान्यता दिली. पेले क्रीडा जगतातील पहिले सुपरस्टार होते. त्यांची प्रसिद्धी फक्त ब्राझीलच नव्हे तर संपूर्ण जगभर होती. एडसन अरांतेस डो नासिमेंटो म्हणजेच पेले यांचा जन्म हा १९४० मध्ये झालला. फुटबॉलची लोकप्रियता जगभर वाढवणाऱ्या दिग्गजांपैकी पेले एक होते. त्यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पेले इतके लोकप्रिय होते की १९७७ मध्ये कोलकात्याला आले तेव्हा संपूर्ण शहर स्तब्ध झाल्याची चित्र होते. २०१५ आणि २०१८ मध्येही ते भारतात आले होते. भ्रष्टाचारा, लष्कराकडून सत्ता पालट, दडपशाही सरकारांचा सामना करत असलेल्या देशात त्यांचा जन्म झाला. १७ वर्षांचे असताना १९५८ ला आपल्या पहिल्या वर्ल्डकपमध्ये पेले यांनी ब्राझीलची प्रतिमा बदलून टाकली. स्वीडनमधील खेळवलेल्या स्पर्धेत त्यांनी चार सामन्यांमध्ये सहा गोल केले. यापैकी दोन फायनलमध्ये केले होते. यजमान संघावर ब्राझीलला ५ विरुद्ध २ अशा गोलने विजय मिळवून दिला. आणि हा विजयाचा सिलसिला पुढील अनेक वर्षे सुरू राहिला. फुटबॉलच्या महान खेळाडूंमध्ये फिफाने पेले यांचा समावेश केला आहे. पेले हे राजकीय नेत्यांचेही हिरो होते. १९७० पूर्वी ते ब्राझीलचे एमिलिओ गारास्ताजू मेडिसी यांच्यासोबत एका मंचावर दिसून आले होते. ब्राझीलमधील सर्वाधिक निर्दयी हुकूमशाही सरकारचे एक सदस्य होते. ब्राझीलने त्यावेळी वर्ल्डकप जिंकला होता. तो पेले यांचा तिसरा वर्ल्डकप होता. ब्राझीलमधील मध्यम वर्गातून आलेले पेले फुटबॉल जगतात लोकप्रिय झाले. पेले यांची लोकप्रियता एवढी होती १९६० च्या दशकात पेले यांचा सामना बघण्यासाठी नायजेरियातील गृहयुद्धात विरोधी गटांनी ४८ तासांसाठी युद्धविराम घोषित केला होता. १९७७ मध्ये ते आशिया दौऱ्यावर असताना ते कोलकात्यातही आले होते. त्यांनी इडन गार्डनवर जवळपास अर्धा तास फुटबॉल खेळले. त्यावेळी ८ हजार प्रेक्षक उपस्थित होते. २०१८ मध्ये पेले कोलकात्यात आले होते. ही त्यांची शेवटची भेट ठरली. पेले कधी ऑलिम्पिक खेळले नाही. पण पेले यांच्या ८० व्या वाढदिवशी ऑलिम्पिकच्या अध्यक्षांनी त्यांचा ऑलिम्पिक खेळाडू म्हणून उल्लेख केला. कारण आपल्या पूर्ण कारकीर्दीत पेले यांनी ऑलिम्पिकची मूल्ये आत्मसात केली, असं ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले होते. फुटबॉल विश्वासाठी पेले यांचे निधन नव्हे, तर ते अमर झाले आहेत.