
नवी दिल्ली: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बाजारच्या कामाच्या वेळेत बदल केला असून पुढील आठवड्यापासून गुंतवणूकदारांना ट्रेडिंगसाठी अधिक वेळ मिळेल. आरबीआयने व्यापाराचे तासांत बदल करत त्याला पुन्हा करोनापूर्व स्थितीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यवर्ती बँकेच्या निर्णयानंतर आता शेअर बाजारातील व्यवहाराची वेळ वाढणार असून हा नवा बदल पुढील आठवड्यात १२ डिसेंबरपासून लागू होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नवीन निर्णयानुसार १२ डिसेंबरपासून शेअर बाजारात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत ट्रेडिंग सुरू राहील. म्हणजे लोकांना गुंतवणुकीसाठी दीड तासाचा अतिरिक्त वेळ मिळेल. या निर्णयामुळे कॉल, नोटीस, टर्म मनी, कमर्शियल पेपर आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स, कॉर्पोरेट बॉण्ड्सच्या ट्रेडिंगसाठी दीड तासांचा अतिरिक्त वेळ उपलब्ध होणार आहे. यापूर्वी मध्यवर्ती बँकेने एप्रिल २०२० मध्ये कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या ऑपरेशनल डिस्लोकेशन्स आणि आरोग्य धोका लक्षात घेऊन वेळेत बदल केला होता. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर व्यापाराच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. "आता कॉल/नोटीस/टर्म मनी, कमर्शियल पेपर, डिपॉझिटचे प्रमाणपत्र आणि मनी मार्केटच्या कॉर्पोरेट बाँड विभागातील रेपो तसेच रुपयाच्या व्याजदर डेरिव्हेटिव्हसाठी बाजाराचे तास पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे," रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. शेअर बाजाराचे नवीन वेळापत्रक कॉल/सूचना/टर्म मनी वेळा: सकाळी ९:००-दुपारी ३:३० मधून सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० पर्यंत वाढवले जाईल. मार्केट रेपो: सकाळी ९:०० ते दुपारी २:३० पर्यंत असेल. ट्राय पार्टी रेपो: सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० पर्यंत. व्यावसायिक कागद आणि ठेव प्रमाणपत्र: सकाळी ९ ते दुपारी ३:३० पासून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत वाढवले जातील. कॉर्पोरेट बाँड्समधील रेपो: सकाळी ९ ते दुपारी ३:३० ऐवजी आ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत काम करेल सरकारी सिक्युरिटीज वेळ: सकाळी ९ ते दुपारी ३:३० पर्यंत. फॉरेक्स चलन ट्रेडिंग: सकाळी ९ ते दुपारी ३.३० पर्यंत असेल. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने १८ एप्रिल २०२२ पासून सदस्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सकाळी ९ वाजता बाजार उघडण्याचे तास पुनर्संचयित केले होते.