औरंगाबादेत सून निवडून आल्याने विरोधकांनी सूड उगवला, सासऱ्याची पपईची बागच उद्ध्वस्त केली! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 25, 2022

औरंगाबादेत सून निवडून आल्याने विरोधकांनी सूड उगवला, सासऱ्याची पपईची बागच उद्ध्वस्त केली!

https://ift.tt/1bKPncZ
औरंगाबाद : गावगाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे काही दिवसांपूर्वी निकाल लागले. निवडणूक म्हटलं की प्रतिस्पर्धींमध्ये चुरस, कार्यकर्त्यातील वाद हे चित्र आता जवळपास सर्वच ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र औरंगाबादेतील करोडी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सून निवडणूक जिंकून आल्याने सासऱ्याच्या शेतातील चक्क साडेतीनशे पपईची झाडं उद्ध्वस्त करण्यात आली. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी रामभाऊ धोंडिबा दवंडे (रा.करोडी) यांची गट क्रमांक ८५ मध्ये ७ एकर शेती आहे. या शेतीमध्ये त्यांनी सुमारे ७०० पपईच्या झाडांची लागवड केली होती. दरम्यान त्यांची सून सोनाली दवंडे यांनी गावातून ग्रामपंचायत निवडणूक लढविली. या निवडणुकीत सोनाली यांनी विजयी गुलाल उधळला. विजयानंतर परिवारासह गावकऱ्यांनी जल्लोष केला. मात्र या आनंदावर काही तासातच विरजन पडले. काही अज्ञात विरोधकांनी शेतातील सुमारे तीनशे पेक्षा अधिक पपईची झाडे तोडून फेकली. एकीकडे सून जिंकल्याचा आनंद तर दुसरीकडे पीक उद्ध्वस्त अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान औरंगाबाद जिल्ह्यात झालं. त्यातील एक शेतकरी म्हणजे दवंडे. इतर पिके तर गेली. मात्र पपईचे पीक चांगले येईल अशी त्यांना अशा होती. त्यामुळे त्यांनी दिवसरात्र एक करून पपईच्या पिकाला सांभाळले. आणि अपेक्षेनुसार पीकही चांगले आले. काही दिवसातच पपई बाजारात येण्यासाठी तयार झाल्या होत्या. निवडणूक झाली. सून जिंकून आली.आता एक दोन दिवसांनी पपई बाजारात येणारच होती. मात्र ही बाब विरोधकांच्या पचणी पडली नाही आणि रात्रीतून त्यांनी पपईची शेती उद्ध्वस्त केली. दावंडे यांचं मोठं नुकसान झालंय. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.