
पुणे : क्रिकेटपटू रवींद्र जडेजानं दिवंगत शिवसेनाप्रमुख () यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. आता गुजरातींनी एक गोष्ट समजून घेण्याची वेळ आली आहे. 'नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) सरकार गुजरातमधून गेले, तर गुजरात गेले' असे बाळासाहेब या भाषणात म्हणाले होते. तोच व्हिडीओ रवींद्र जडेजाने शेअर केला आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा उत्तर जामनगर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आहेत. याचाच धागा पकडत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना वाचवलं आहे. नर्मदा आंदोलनाच्या वेळेस नरेंद्र मोदी एकटेच उपोषणाला बसले होते. त्यावेळेस भाजपचं कोणीही गेलं नव्हतं. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी यांना सांगितलं होतं की, नरेंद्र मोदी हे उपोषणाला बसले आहेत तुम्ही तिकडे जाऊन या. त्यावेळेस उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी यांना भेटून आले होते, , असे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. त्यावेळेस उद्धव ठाकरे कोणत्याही पदावर नव्हते. त्यामुळे आता ते किती खोटं बोलत आहेत ते समोर येत आहे. मोदींचा फोटो लावला म्हणून जिंकून आले असं ते म्हणतात. मात्र १९९५ साली कोणाचा फोटो लावून जिंकून आलात, असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारला आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी सभा घेतल्यामुळे सत्ता आली होती. यांच्या मुंबई आणि पुण्यामध्ये साध्या शाखा देखील नव्हत्या. आज यांचे फाईव्ह स्टार कार्यालय झाले आहे हे कुठून आले हे ईडीलाच विचारायला पाहिजे, असे अरविंद सावंत म्हणाले आहेत. काय म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे ? 'माझं म्हणणं इतकंच आहे, नरेंद्र मोदी गेले, गुजरात गेलं, हे माझं वाक्य आहे, जर नरेंद्र मोदीला तुम्ही बाजूला केलंत, तर गुजरात तुमचा गेला, हे माझं वाक्य मी लालकृष्ण अडवाणींपाशी बोललेलो आहे', असे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते. भाजप छत्रपतींचा अवमान गिळायला सांगत आहे का ? दुसरीकडे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादाचा विषय उदयनराजांनी आता संपवावा अशी हात जोडून विनंती केली आहे. यावर देखील अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी विषय निर्माण केला त्याच्यावर कारवाई करा. तुम्ही आम्हाला छत्रपतींचा अवमान गिळायला सांगत आहात का? उद्या असंच धाडस आणखी कोणी करेल. आता तुमचा माणूस आहे म्हणून विषय संपवावा आणि इतरांचा माणूस असेल तर तो माणूसच संपवावा हे असं भाजपचं गणित आहे, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे. 'राज ठाकरेंनी काल जे केलं ती महाराष्ट्राची संस्कृती नाही' मनसेच्या मुंबईतील गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची नक्कल करत टीका केली होती. यावरून अरविंद सावंत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे किती गंभीर आजारात होते हे समजायचं असेल तुम्ही डॉक्टरांचा अभिप्राय घ्या. काल-परवा काहीजणांनी याची चेष्टा केली. हे निंदनीय आहे. हे अजिबात शोभनीय नाहीये. व्यंग आणि आजार यावर कधीही खालच्या थरावर जाऊन टीका करू नये. त्यामुळे त्या दिवशी जे काही केलं गेलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं प्रत्युत्तर अरविंद सावंत यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे.