कोल्हापूर पोलिसांना गुप्त माहिती, कार थांबवून तपासताच सारेच हादरले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 22, 2023

कोल्हापूर पोलिसांना गुप्त माहिती, कार थांबवून तपासताच सारेच हादरले...

https://ift.tt/cr8UHhp
कोल्हापूर: कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोल्हापूर गगनबावडा मार्गावर मरळी फाट्यावर सापळा रचून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये चौघा जणांच्या टोळीला ताब्यात घेत त्यांच्याकडून संगणक, प्रिंटर आणि इतर साहित्य तसेच क्रेटा कार आणि मोबाईल फोन असा १२ लाख ६२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अमंलदार विजय गुरखे यांना पांढऱ्या रंगाची हुंडाई कंपनीची एमएच-०९-डीएक्स-८८८८ ही क्रेटा कार बनावट नोटा घेऊन कळे-कोल्हापूर रोडने येणार असल्याची बातमी मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मरळी फाट्यावर सापळा लावला. यावेळी संशयिताची क्रेटा कार अडवून संशयित आरोपी कारमधील चंद्रशेखर बाळासाहेब पाटील (वय ३४, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी), अभिजीत राजेंद्र पवार (वय ४०, रा.गडमुडशिंगी, ता. करवीर), दिग्विजय कृष्णात पाटील (वय २८, रा. जयभवानी तालमीसमोर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांची कारसह झडती घेतली असता गाडीमध्ये बनावट नोटा आढळल्या. तसेच, बनावट नोटा तयार करणारा संदीप बाळू कांबळे (वय ३८, रा. आंबेडकर नगर, कळे, ता. पन्हाळा) याच्या घरात एकूण ४,४५,९०० रुपये किंमतीच्या ५०० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. दरम्यान, या कारवाईत पोलिसांच्या पथकाने त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्याचे संगणक, प्रिंटर आणि इतर साहित्यासह क्रेटा कार तसंच मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला तर संशयित आरोपी विरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शेषराज मोरे, पोलीस अंमलदार विजय गुरखे, वैभव पाटील, सचिन देसाई, अनिल पास्ते, हिंदूराव केसरे, रणजित पाटील, दीपक घोरपडे, सोमराज पाटील आणि रफिक आवळकर आणि सायबर पोलीस ठाण्याकडील अमर वासूदेव आणि सुरेश राठोड यांनी केली.