
मुंबई : मद्यपी चालकाने दुचाकी आणि बस थांब्यावर उभ्या असलेल्या चौघांना धडक दिल्याची घटना शुक्रवारी अंधेरीच्या मरोळ डेपो परिसरात घडली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या चौघांपैकी एकाचा मृत्यू झाला असून, एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. संदीप बनकर आणि स्टीव्हन रॉड्रिक्स अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.अशी आहे घटनाअंधेरी येथील एका मेटल व्यावसायिकाकडे कामाला असलेला संदीप चारचाकी वाहनातून साहित्याची ने-आण करतो. शुक्रवारी सायंकाळी संदीप साहित्य घेऊन ग्राहकाकडे डिलिव्हरीसाठी निघाला. यावेळी त्याने मित्र रॉड्रिक्स यालाही बोलावून घेतले. दोघांनी गाडीमध्ये मद्यपान केल्यानंतर रॉड्रिक्स स्वतः चालविण्यास बसला. महाकाली गुंफा परिसरात रॉड्रिक्सने दुचाकीवरून जाणाऱ्या जगनाथ गाडे यांना धडक दिली. दुचाकीला धडक दिल्यानंतर त्यांचे गाडीवरील नियंत्रण आणखीनच सुटले आणि पुढे असलेल्या बसथांब्यावर ती धडकली. बस थांब्यावर उभ्या असलेल्या मधुकर बंदुगडे, संजय राम आणखी एका व्यक्तीला गाडीची धडक बसली. या अपघाताची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिस आल्याची कुणकुण लागताच संदीप आणि स्टीव्हन यांनी पळ काढला.दरम्यान, पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले. गंभीर दुखापत झाल्याने संजय राम याचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना वाहनाचा क्रमांक मिळाला. या क्रमांकावरून पोलिस वाहनाच्या मालकापर्यंत पोहोचले. त्यावेळी ते संदीप चालवत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी संदीप आणि त्याच्यासोबत गाडीत असलेल्या स्टीव्हन या दोघांना शोधून काढले. न्यायालयाने या दोघांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.