
पुणे/मुंबई : केंद्र सरकारने बंदी घातलेला ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ या ‘बीबीसी’ने तयार केलेल्या माहितीपटाच्या प्रदर्शनावरून देशभरात सध्या वादाला तोंड फुटले असतानाच, राज्यातही या वादाचे लोण पसरले. पुण्यातील ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) या संस्थेत विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या रात्री हा माहितीपट दाखविण्यात आला, तर मुंबईतही ‘टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस’च्या (टिस) विद्यार्थ्यांनीही शनिवारी तो कॅम्पसमध्ये पाहिला. दरम्यान, भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘टिस’विरोधात आंदोलन केले.दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठासह काही शिक्षण संस्थांमध्ये या माहितीपटावरून गोंधळ सुरू असताना, ‘एफटीआयआय’मध्ये प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला या माहितीपटाचे सादरीकरण कोणत्याही गोंधळाविना पार पडले.‘बीबीसी’ने नुकत्याच प्रदर्शित केलेल्या गुजरात दंगलीवरील माहितीपटावर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली आहे. हा माहितीपट विविध वेबसाइटवरून हटविण्यात आल्यानंतरही काही वेबसाइटवर तो उपलब्ध आहे. या माहितीपटाच्या सादरीकरणावेळी जेएनयू प्रशासनाने वीज खंडित केल्याने दगडफेक झाल्यानंतर काही विद्यार्थी जखमी झाले; तसेच जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात सादरीकरणाआधी चार विद्यार्थांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले. या प्रकारांचा निषेध म्हणून पुण्यात ‘एफटीआयआय स्टुडंट असोसिएशन’तर्फे २६ जानेवारीला रात्री दहा वाजता व्हिज्डम ट्रीजवळ मोकळ्या जागेत पडद्यावर हा माहितीपट दाखविण्यात आला. या वेळी सुमारे शंभर विद्यार्थी उपस्थित होते.‘साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट आणि प्रसारमाध्यमांवर बंदी घालणे हे ढासळलेल्या समाजाचे लक्षण आहे. लोकशाही देशात चित्रपटांवर बंदी घातली जाऊ शकत नाही. ‘बीबीसी’चा माहितीपट देशातील हिंसाचार अधोरेखित करतो. माहितीपट पाहून भारतातील कोणीही आश्चर्यचकित झाले, तर ते जास्त धक्कादायक आहे. जातीय आणि धार्मिक हिंसाचार सत्ताधारी पक्षाच्या राजकारणाचा एक भाग झाला आहे. चित्रपट पाहणे हे सेन्सॉरशिपला उत्तर आहे. कोणी काय पाहावे हा निर्णय नागरिकांवर सोडून दिला पाहिजे, इतकेच आम्हाला या सादरीकरणाद्वारे म्हणायचे आहे’, अशी भूमिका स्टुडंट असोसिएशनतर्फे मांडण्यात आली. माहितीपटावरील बंदीचे समर्थन केल्याबद्दल प्रख्यात दिग्दर्शक आणि ‘एफटीआयआय’चे अध्यक्ष शेखर कपूर यांचा विद्यार्थांनी निषेध केला.विद्यार्थ्यांच्या एका गटाने माहितीपट दाखविल्याचे सांगण्यात येत आहे. या सादरीकरणासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली नव्हती. या प्रकरणाची दखल घेतली जाईल.- सय्यद रबीहश्मी, कुलसचिव, ‘एफटीआयआय’दिल्ली विद्यापीठातील गोंधळाची चौकशीनवी दिल्ली : सन २००२च्या गुजरात दंगलीवरील बीबीसीचा माहितीपट दाखविण्यावरून दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) कला शाखेच्या इमारतीबाहेर झालेल्या गोंधळाची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने सात सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या प्रॉक्टर (शिस्तपालन अधिकारी) रजनी अब्बी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सोमवार, ३० जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुलगुरू योगेश सिंग यांना चौकशी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ही समिती विशेषत: २७ जानेवारीला विद्यापीठातील कला शाखेच्या इमारतीबाहेर आणि प्रवेशद्वारासमोर घडलेल्या गोंधळाची चौकशी करणार आहे.