मुंबई प्रदूषणप्रश्नी घेणार IIT कानपूरची मदत; हरयाणा पॅटर्न राबविण्याची शक्यता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, January 30, 2023

मुंबई प्रदूषणप्रश्नी घेणार IIT कानपूरची मदत; हरयाणा पॅटर्न राबविण्याची शक्यता

https://ift.tt/cXgsaY3
मुंबई : मुंबईतील वाढत्या प्रदूषणप्रश्नी राज्य सरकारने आता गंभीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच आयआयटी कानपूरची मदत घेणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. आयआयटी कानपूरच्या मदतीने राबविण्यात आलेला हरयाणा पॅटर्न राज्यातही राबविला जाण्याची शक्यता असून त्यासाठी चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी आयआयटी कानपूरचे एक पथक लवकरच मुंबईत येणार असल्याचे सांगितले जात आहे.मुंबईतील वाढत्या प्रदूषणप्रश्नी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाची बैठक मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडली होती. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आल्याचे कळते. या अगोदर दिल्ली सरकारनेदेखील आयआयटी कानपूरच्या मदतीने प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे राज्यात विशेषत: मुंबईत यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.आयआयटी कानपूरने या अगोदर केलेल्या इतर राज्यांच्या सर्वेक्षणात अनेक मुद्यांवर प्रकाश टाकला होता. त्यात प्रामुख्याने घरगुती स्वयंपाक, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, बांधकाम व्यवसाय, वाहनांची वाढती संख्या, वाढते क्राँक्रिटीकरण, उद्योगधंदे आणि बायोमास बर्निंग यासाख्या अनेक गोष्टींचा समावेश होता. त्यामुळे आता मुंबईतील प्रदूषणासंदर्भात अहवाल तयार करताना या सर्व बाबींचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लवकरच आयआयटी कानपूरचे एक पथक या सर्व अभ्यासासाठी मुंबईत येणार आहे. आयआयटी कानपूरच्या मदतीने हरयाणामध्ये विशेष पॅटर्न राबविण्यात आला. याच पॅटर्नची मुंबईत पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आयआयटी कानपूरने दिलेल्या अहवालात हॉटेल व्यावसायिकांकडून होत असलेला कोळशाचा वापर थांबविणे, घरगुती स्वयंपाक तयार करण्यासाठी सर्वांना एलपीजीची व्यवस्था करून देणे, ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे; ती सर्व जागा नीट झाकणे, बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू उघड्यावर न ठेवता झाकून ठेवणे, मोकळ्या जागेत लहान झुडपे लावणे, खुल्या जागांवर गवत लावणे अशा अनेक सूचना केल्या आहेत. त्याच सूचना मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी केल्या जातील, अशी माहिती सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.मुंबईतील वाढत्या प्रदूषणासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. यासाठी आयआयटी कानपूरची मदत घेण्याचा विचार सुरू असून त्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल.- दीपक केसरकर, पालकमंत्री