मुंबई : विधानसभेत बहुमत सिद्ध करीत सत्तांतर घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या भाजपने विधान परिषदेतही संख्याबळ वाढविण्यासाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. मात्र भाजपला पराभवाचा जबर धक्का बसला असून भाजपचे पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भातील नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर यापैकी नागपूरची जागा महाविकास आघाडीने भाजपकडून हिसकावून घेतली असून अमरावतीत मविआचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. कोकण शिक्षकची जागा मात्र आघाडीकडून खेचण्यात भाजपला यश मिळाले आहे. अपेक्षेप्रमाणे नाशिक पदवीधरची जागा अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी; तर औरंगाबादची जागा आघाडीने जिंकली. त्यामुळे आघाडीने भाजपविरोधातील विधान परिषद निवडणुकीचा सामना तीन विरुद्ध एक असा जिंकला आहे.शिक्षक मतदारसंघात झालेले प्रचंड मतदान आणि पदवीधरांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने निवडणुकीत कोण बाजी मारणार याची राजकीय क्षेत्रात बरीच उत्सुकता होती. त्यात नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे कट्टर समर्थक तसेच काँग्रेसचे नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नातेवाईक सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी भरल्याने परिषदेच्या या निवडणुकीला अनपेक्षित वळण मिळाले. यानिमित्ताने काँग्रेसमधील सुंदोपसुंदी तर चव्हाट्यावरच आलीच, शिवाय सत्यजित तांबे यांच्या निमित्ताने भाजपने थेट काँग्रेसच्या कट्टर घराण्यांमध्येच फोडाफोडीचे राजकारण सुरू केल्याच्या चर्चेलाही तोंड फुटले होते. त्यात मतदानाच्या अवघे दोन ते तीन दिवस आधी तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय स्थानिक भाजपने घेतल्यानंतर जवळपास त्यांचा विजय निश्चित झाला होता. गुरुवारी सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष सत्यजित तांबे विरुद्ध मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील अशी थेट लढत झाली. त्यात तांबे यांनी ६८,९९९ मते मिळवत विजय संपादन केला.'कोकण शिक्षक'मध्ये भाजपचे कमळकोकण शिक्षक मतदारसंघात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि मावळते आमदार बाळाराम पाटील यांचा दारुण पराभव केला. एरव्ही शिक्षक आघाडीला पाठिंबा देणाऱ्या भाजपने या मतदारसंघात प्रथमच पक्षाच्या चिन्हावर म्हात्रे यांच्या रूपाने उमेदवार दिला होता. कोकण शिक्षक हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ होता. मात्र, गेल्या निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील निवडून आले होते. आता यावेळी भाजपने मेहनत घेत कोकण शिक्षक मतदारसंघ परत मिळविला. या विजयाचे श्रेय सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी आखलेल्या रणनीतीला जाते.'नागपूर शिक्षक'मध्ये अडबाले विजयीनागपूर शिक्षक मतदारसंघात आघाडीचे पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांनी भाजप पुरस्कृत शिक्षक आघाडीचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला. उपमुख्यमंत्री यांचा जिल्हा असल्याने ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची बनली होती. गाणार यांनी सलग दोन टर्म नागपूर शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, तिसऱ्यांदा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अडबोले यांच्या विजयात काँग्रेसचे माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी बरीच मेहनत घेतली होती. अडबोले कोणत्याही परिस्थितीत विजयी होणार असल्याचा दावाही केदार यांनी केला होता.औरंगाबादमध्ये भाजपचा पराभवऔरंगाबाद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे. काळे यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला. या मतदारसंघात शिक्षकांनी जुन्या पेन्शनचा मुद्दा मांडला होता. हा मुद्दा भाजपच्या विरोधात गेल्याचे निकालातून स्पष्ट होते.अमरावती पदवीधर मतदारसंघभाजपचे उमेदवार रणजित पाटील आणि मविआचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्यात थेट लढत होती. लिंगाडे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम राखत ४३,३४० मते मिळविली. शेवटची माहिती हाती आली तेव्हा त्यांना विजयासाठी ३,५८० मतांची गरज होती. त्यामुळे मतमोजणी दुसऱ्या फेरीवर पोहोचली. विजयासाठी आवश्यक मतांची संख्या प्राप्त केल्यानंतरच लिंगाडे यांचा विजय जाहीर केला जाईल. दरम्यान, लिंगाडे यांच्या समर्थकांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच आनंदोत्सवाला सुरुवात केली होती.दरम्यान, नागपूरमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगेचच उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य करणारे ट्वीट केले. 'देवेंद्रजी फडणवीस यांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली, जगभरात चालली; मात्र नागपूरमध्ये का नाही चालली? दया कुछ तो गडबड है...', असा टोला त्यांनी लगावला....कोकण शिक्षक मतदारसंघज्ञानेश्वर म्हात्रे (विजयी) - मिळालेली मते - २०,६८३बाळाराम पाटील (पराभूत) - मिळालेली मते - १०,९९७औरंगाबाद शिक्षक मतदारसंघविक्रम काळे (विजयी) - मिळालेली मते - २०,०७८किरण पाटील (पराभूत) - मिळालेली मते - १३,४८९नागपूर शिक्षक मतदारसंघसुधाकर अडबोले (विजयी) - मिळालेली मते - १६,५००नागोराव गाणार (पराभूत) - मिळालेली मते - ६,३३६अमरावती पदवीधर मतदारसंघरणजित पाटील (आघाडीवर) - मिळालेली मते - ४३,३४०धीरज लिंगाडे (पिछाडीवर) - मिळालेली मते - ४१,०२७नाशिक पदवीधर मतदासंघसत्यजित तांबे (विजयी) - मिळालेली मते - ६८,९९९शुभांगी पाटील (पराभूत) - मिळालेली मते - ३९,५३४