सावित्री नदीवर रेड्याला पाणी पाजायला नेलं, रस्सीमुळे खोल पाण्यात ओढला गेला अन् अनर्थ घडला... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 21, 2023

सावित्री नदीवर रेड्याला पाणी पाजायला नेलं, रस्सीमुळे खोल पाण्यात ओढला गेला अन् अनर्थ घडला...

https://ift.tt/Ex8ebuc
रायगड: कोकणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पोलादपूर तालुक्यातील लोहारे गावातील एका तरूणाचा सावित्री नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या तरूणाच्या अकाली मृत्यूने लोहारे पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सावित्री नदीपात्रामध्ये होडीनाका पिंपळाचा डोह येथे नेहमीप्रमाणे रेड्याला पाणी पाजण्यासाठी गेलेला २२ वर्षीय तरूण यश सुरेश थिटे याच्या हातात रेड्याची रस्सी होती. रेडा पुढे गेल्यानंतर रस्सीमुळे खोल पाण्यात ओढला जाऊन सावित्री नदीच्या पात्रामध्ये यश बुडाला. या घटनेनंतर नरवीर मदत टीमचे दीपक उतेकर आणि अन्य स्थानिक तरूणांनी यशला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, तत्पूर्वीच यश याचा मृतदेह पाण्यावर तरंगू लागला. त्यानंतर तात्काळ त्याला ग्रामस्थांच्या मदतीने रूग्णवाहिकेतून पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आले. यावेळी माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे तसेच अन्य सामाजिक क्षेत्रातील मंडळी यशच्या दुर्दैवी मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या निवासस्थानी दाखल झाले. यानंतर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी पोलीस उपनिरिक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरीय तपासणी आणि पंचनामा करून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात यश याचे पार्थिव देण्यात आले. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यू र.नं. ०५-२०२३ नुसार सीआरपीसी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक भोसले करीत आहेत.