म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : अंबरनामधील उद्धव ठाकरे गटातील शहर प्रमुखांपासून शेकडो पदाधिकाऱ्यांनी अखेर ठाकरे गटाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रविवारी संध्याकाळी प्रवेश केला. बंडखोरीनंतर गेले नऊ महिने अंबरनाथ शहर शाखा ठाकरे समर्थकांच्या ताब्यात असताना रविवारी याच निष्ठावंत ठाकरे समर्थकांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे शहर शाखेतून हटवली. त्यामुळे अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंचे यांनी एकहाती वर्चस्व मिळवले असून उद्धव ठाकरे गटाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.अंबरनाथमध्ये गेली अनेक वर्षे शिवसेनेची एकहाती सत्ता असून येथील पदाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबदबा आहे. त्यामुळेच शिंदे यांनी ठाकरे गटातून बंडखोरी केल्यानंतर अंबरनाथमधून सर्वांत पहिले त्यांना आमदार, माजी नगराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे समर्थन मिळाले होते. मात्र त्यानंतरही शहर प्रमुख वाळेकर यांच्या गटाने गेले काही महिने तटस्थ भूमिका घेतली होती. अखेर पडद्यामागील घडामोडींनंतर वाळेकर आणि त्यांच्या कुटुंबानेही शिंदे गटात प्रवेश घेतला. मात्र वाळेकरांच्या मर्जीतील समर्थकांनी ठाकरे गटात थांबून शहर शाखा ताब्यात ठेवत ठाकरे गटाचे अस्तित्वही शाबूत ठेवले होते. ठाकरे गटातील समर्थकांनी या काळात आमदार तसेच मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने काही पदाधिकाऱ्यांना पोलिस स्टेशनच्या फेऱ्याही माराव्या लागल्या होत्या. त्यामुळे दोन्ही गटातील वैर दिवसेंदिवस वाढत होते. अखेर आगामी निवडणुका आणि शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल पाहता या दोन्ही गटांतील वाद संपुष्टात आणण्यासाठी रविवारी रात्री खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची वर्षा निवासस्थानी बैठक घेत आपापसातील वाद मिटवत पक्षवाढीसाठी काम करण्याची समज दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.या घडामोडींनंतर रविवारी संध्याकाळी अरविंद वाळेकर यांनी ठाकरे गटातील त्यांचे निकटवर्तीय शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी, महिला संघटक आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शिवसेनेत येण्याबाबत चर्चा केली. अखेर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनीच अंबरनाथ शहर शाखेतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढून अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर रात्री उशिरा अंबरनाथ येथे शिवमंदिर आर्ट फेस्टिवलनिमित्त पाहणी करण्यासाठी आलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ठाकरे गटातून शिवसेनेत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. ठाकरे गटाचे उरलेसुरले पदाधिकारीही शिवसेनेत गेल्याने अंबरनाथमध्ये ठाकरे गटाचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे पहायला मिळत आहे.कुरघोड्या थांबणार का?पदाधिकाऱ्यांनी रविवारी संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिंदे गटातील जुन्या पदाधिकाऱ्यांसमोर ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्यांची विशेष कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानंतर दोन्ही गट शिवसेनेत आले असले तरी या दोन्ही गटांतील कुरघोड्या थांबण्याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहे.
https://ift.tt/pK5Ao2v