ISKP case :'एनआयए'चे पुण्यात पुन्हा छापे, दोन संशयितांसह महत्वाची कागदपत्रे केली जप्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 14, 2023

ISKP case :'एनआयए'चे पुण्यात पुन्हा छापे, दोन संशयितांसह महत्वाची कागदपत्रे केली जप्त

https://ift.tt/XfiToyu
म. टा. प्रतिनिधी, पुणे : इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (आयएसकेपी) प्रकरणातील दोन संशयितांशी संबंधित पुण्यासह चार ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापे टाकले. ‘एनआयए’च्या पथकाने पुणे; तसेच मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात छापे टाकून काही कागदपत्रे जप्त केली; तसेच दोन संशयितांना ताब्यात घेतले. ‘एनआयए’च्या पथकाकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.अशी आहे घटनापुण्यातील तलहा खान; तसेच मध्य प्रदेशातील सिवोनी गावातील अक्रम खान यांच्या घरी ‘एनआयए’च्या पथकाने छापे टाकले. दिल्लीतून काश्मिरी दाम्पत्य जहाँजेब वाणी आणि त्याची पत्नी बशीर बेग यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. वाणी दाम्पत्य ‘इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत’ या दहशतवादी गटाशी संबंधित असल्याची माहिती तपासात मिळाली होती. या प्रकरणात तिहार कारागृहात असलेला आरोपी अब्दुल बशिथ संशयित असल्याची माहिती मिळाली होती. परदेशातील सूत्रधारांच्या सूचनेनुसार आरोपी देशात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते. त्यांना आभासी चलनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेण्यासाठी दहशतवादी गटांकडून प्रयत्न सुरू होते. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांच्या ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांत प्रसारित करण्यात आल्या होत्या. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील तरुणांना एकत्र आणून त्यांच्याकडून दहशतवादी कारवाया करून घेतल्या जाण्याची शक्यता होती, अशी माहिती ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी दिली.