
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : यंदा थंडीच्या ऋतूमध्ये सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान असल्याची सातत्याने नोंद झाली. तसेच, या मोसमामध्ये पडणारा पाऊस आणि हिमवृष्टीचेही प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. डिसेंबर २०२२ हा गेल्या १२२ वर्षांमधील सर्वाधिक उष्ण महिना ठरला. फेब्रुवारी २०२३मध्ये सन १९०१ पासूनचा सहाव्या क्रमांकाचा सर्वांत कमी पाऊस नोंदला गेला आहे, तर कमाल तापमानाची सरासरीही यंदाच्या फेब्रुवारीमध्ये १९०१पासून सर्वाधिक होती. सन २०१६चाही उच्चांक यंदाच्या फेब्रुवारीतील सरासरी कमाल तापमानाने मोडला. जागतिक तापमानवाढीच्या या परिणामांकडे या निमित्ताने लक्ष वेधण्यात येत आहे. वातावरण बदलामुळे तापमान आणि पाऊस यामध्ये बदल दिसू लागले आहेत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.यंदा थंडीच्या ऋतूमधील पश्चिमी प्रकोपांचे प्रमाण कमी होते. पश्चिमी प्रकोपामुळे वायव्य आणि लगतच्या मध्य भारतामध्ये थंडीची जाणीव होते. जानेवारीमध्ये पश्चिमी प्रकोपांचे प्रमाण इतर दोन महिन्यांपेक्षा जास्त होते तरी याचा परिणाम फारसा दिसला नाही. नोव्हेंबरमध्ये सरासरीपेक्षा ३७ टक्के पासऊ कमी होता. डिसेंबरमध्ये १२ टक्के, जानेवारीमध्ये १३ टक्के तर फेब्रुवारीमध्ये ६८ टक्के पाऊस कमी नोंदला गेला. वायव्येमध्ये डिसेंबरमध्ये ८२ टक्के पावसाची तूट नोंदली गेली. मध्य भारतात डिसेंबरमध्ये ७६ टक्के पाऊस कमी होता. जानेवारीमध्ये वायव्य भारतात २८ टक्के पाऊस सरासरीहून अधिक तर मध्य भारतात ७५ टक्के पाऊस सरासरीहून कमी नोंदला गेला. फेब्रुवारीमध्ये वायव्य भारतात ७५ टक्के, तर मध्य भारतात ९९ टक्के तूट होती. या कालावधीत कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मात्र हा प्रभाव केवळ दक्षिण भारतापुरताच मर्यादित होता.डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत सरासरी कमाल तापमानाहून तिन्ही महिन्यांचे तापमान चढे होते. डिसेंबर २०२२चे सरासरी कमाल तापमान त्या महिन्याच्या सरासरी तापमानाच्या तुलनेत ०.७९ अंश सेल्सिअसने अधिक होते. जानेवारीत ०.१९, तर फेब्रुवारीमध्ये मात्र हे तापमान तब्बल १.७३ अंश सेल्सिअसने जास्त होते. या पार्श्वभूमीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझमचे संचालक डॉ. ए. पी. दिमरी यांनी पश्चिमी प्रकोपांमध्ये बदल होत असल्याचे दिसत असल्याची माहिती दिली. यामुळे पाऊसही पडत नसल्याचे दिसत आहे. उलट पश्चिमी प्रकोप असताना उत्तर भारतात चांगला पाऊस झाल्याचे दिसून आले आहे. स्कायमेटचे उपसंचालक यांनी आर्क्टिक प्रदेशातील सरासरीहून अधिक तापमान हे जागतिक तापमानवाढीचा परिणाम असून याचा थेट आशियावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले. डिसेंबर अधिक उष्णकमी झालेल्या पावसाच्या आणि वाढलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर काही हवामानतज्ज्ञ हा बदलत्या वातावरणाचा परिणाम असल्याचे स्पष्ट करत आहेत. सर्वसाधारणपणे नोव्हेंबरच्या मध्यापासून पश्चिमी प्रकोपांचे प्रमाण वाढू लागते. यंदा मात्र नोव्हेंबरमध्ये हा प्रभाव दिसला नाही. डिसेंबरमध्ये पाऊस, बर्फवृष्टी नव्हती. हा महिना अधिक उष्ण असल्याचे जाणवले. या महिन्यात सात वेळा पश्चिमी प्रकोपाची स्थिती निर्माण झाली, मात्र एकाच वेळी बर्फवृष्टी झाली.