
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ‘श्रीराम हे हिंदुत्वाचे प्रतीक आहेत. त्यामुळे ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांच्यासोबत राम राहूच शकत नाही,’ अशी बोचरी टीका शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. रामनवमीनिमित्त केसरकर श्रीकाळाराम मंदिरात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.आपण हिंदुत्वापासून लांब गेलो हे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांसमोरच कबूल केले होते. महाराष्ट्रात युती पुन्हा पुनर्प्रस्थापित करू, असे आश्वासन दिल्लीत देऊनही ठाकरेंनी ते पाळले नाही, असा खुलासाही केसरकर यांनी केला. राज्यात कुठेही आणि काहीही घडले, तरी विरोधकांकडून भाजपवर आरोप करण्याचा प्रयोगच राज्यात विरोधकांकडून सुरू आहे. मात्र, सरकार कुठल्या परिस्थितीत जातीय दंगली घडू देणार नाही, असा दावाही त्यांनी केला. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले. तुम्ही हिंदुत्वही सोडले. मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेने हेच दाखवून दिले, की काँग्रेसच्या मतांसाठी तुम्ही किती लाचार झाला आहात. पुन्हा जर सावरकरांचा अपमान केला, तर आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही, असा इशारा देता आला असता, असा टोलाही केसरकरांनी लगावला. पाटील, पवार यांना टोलाराज्यातील सरकार जाऊन लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. त्यावरही केसरकर यांनी टीकास्र सोडले. ‘मला आजपर्यंत असं वाटत होतं, काही नेते उशिरापर्यंत झोपतात आणि जे उशिरा झोपतात त्यांना स्वप्नं दिसतात. मात्र, अजितदादा आणि जयंत पाटील हे लवकर उठणारे नेते आहेत, त्यांनादेखील अशी स्वप्नं पडायला लागली आहेत,’ असा टोला केसरकर यांनी राष्ट्रपती राजवट लागण्याच्या मुद्यावर लगावला. केसरकर म्हणाले...-उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी हातमिळवणी करून काय मिळविले?-आम्हाला दोष देण्यापुरतेच वापरले जातेय बाळासाहेबांचे नाव-अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना एकदाही नामांतराचा विषयच नाही-सत्ता गेली तेव्हा कॅबिनेटची बैठक बोलवून शहरांचे नामांतर-दहा कॅबिनेट मंत्री गैरहजर असताना शहरांची नावे कशी बदलली?