
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मालाड येथील १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून कोलकात्याला नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी या मुलीच्या परिचयातील असून त्यांनी खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला आहे.कुर्ला परिसरात राहणाऱ्या दोन तरुणांनी त्यांच्या परिचयातील मालाडच्या अल्पवयीन मुलीला संपर्क केला. तिचे मालाड येथील घर गाठून आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत तिचे अपहरण केले. तिला घेऊन दोघेही कोलकाता येथे गेले. या ठिकाणी दोघांनी बलात्कार केला. या दोघांनी सोडल्यानंतर मुलीने घर गाठले आणि सर्व घटना सांगितली. दोघेही आरोपी कुर्ला परिसरात राहणारे असल्याने याप्रकरणात विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करून दोघांनाही अटक केली.