
जळगाव : एरंडोल तालुक्यातील भातखंडे ते उतरान दरम्यान रविवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणाचा मृतदेह आढळून आला. अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अमोल पाटील (वय ४०, रा. अंतुर्ली ता. पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वाळू व्यावसायिक होता. वाळू वाहतुकीवरून असलेली स्पर्धा तसेच जुन्या वादातून त्याचा खून झाल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणी विश्वसनिय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली नं.३ येथील रहिवाशी अमोल पाटील हा वाळू व्यावसायिक होता. रविवारी सकाळी एरंडोल तालुक्यातील भातखंडे आणि उतरान परिसरात रक्ताच्या थारोळ्यात अमोलचा मृतदेह मिळून आला. त्यांच्यावर मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याचे सांगितले जात आहे. तर खुनाची घटना लपविण्यासाठी मारेकऱ्यांनी अपघाताचा बनाव केल्याचीही प्राथमिक माहिती घटना स्थळवरून मिळाली आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर कासोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निता कायटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात रवाना करण्यात आला. मृतदेह पाचोरा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला होता. मात्र नातेवाईकांनी इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केल्याने मृतदेह धुळ्याला हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही घटनास्थळ गाठून माहिती जाणून घेतली. हा खून करण्यामागचे नेमके कारण समोर आलेले नसले तरी वाळू वाहतुकीवरून असलेली स्पर्धा तसेच याच व्यवसायातील जुन्या वादातून अमोल याचा खून झाल्याची चर्चा आहे. अमोल हा वाळू व्यवसायिक असल्याने तो पाचोरा तालुक्यात सर्वांना परिचित आहे. अमोल हा एरंडोल तालुक्यात भातखंडे, उतरान या परिसरात कसा व कशासाठी गेला? त्याचा खून नेमका कोणत्या कारणावरून व कोणी केला? या सर्व प्रश्नांची उत्तरे सद्यस्थितीत अनुत्तरीत आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. खून करून मारेकऱ्यांनी अपघाताचा सिनेस्टाइल पद्धतीने बनाव केल्याने मारेकऱ्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.