अनेक अवघड चढाया, मात्र रविवारी अचानक तोल गेला अन् घात झाला; गिर्यारोहकाचा दरीत कोसळून मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 20, 2023

अनेक अवघड चढाया, मात्र रविवारी अचानक तोल गेला अन् घात झाला; गिर्यारोहकाचा दरीत कोसळून मृत्यू

https://ift.tt/fmPqcsr
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कल्याण-नगर रस्त्यावरील माळशेज घाट परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेल्या नाशिकच्या गिर्यारोहकाचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. किरण काळे (५०, रा. टाकळी रोड, नाशिक) असे त्याचे नाव आहे. नाणेघाट भागात चोरदरीत रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. काळे यांचे पार्थिव रात्री उशिरा नाशिकमध्ये आणण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. काळे यांच्यासोबत गेलेले इतर गिर्यारोहक सुखरूप असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.प्रसिद्ध गिर्यारोहक आणि एलआयसीचे अधिकारी (डीओ) म्हणून किरण काळे जिल्ह्यात प्रसिद्ध होते. अनेक अवघड चढाया त्यांनी पूर्ण केल्या आहेत. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांच्यासह नाशिकमधील बारा गिर्यारोहकांचा एक गट ट्रेकिंगसाठी रविवारी सकाळी माळशेज घाटात गेला होता. दुपारी घाटमाथ्याकडे जात असताना, चोरदरी या खडतर वाटेवर पाच जण दरीत अडकून पडले. या दरम्यान तोल गेल्याने दरीत कोसळून काळे यांचा मृत्यू झाल्याचे समजते. या संदर्भात माहिती मिळताच स्थानिक पोलिस, महसूल, वन आणि स्वयंसेवी संस्थांनी धाव घेतली. मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारापैकी अकरा जण सुखरूप आहेत. मात्र, या दुर्घटनेत काळे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ट्रेकर्स आणि दुर्गभ्रमंती करणाऱ्या संस्थांनी काळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत स्थानिक पोलिस व प्रशासनाचा तपास व इतर कार्यवाही सुरू होती. यापूर्वीच्या जिल्ह्यातील दुर्घटना...- जुलै २०२२ मध्ये शिवकालीन साल्हेर किल्ल्यावर मालेगाव येथील १२ मित्र पर्यटनासाठी गेले होते. किल्ल्यावर ट्रेकिंग करत असताना पाय घसरल्याने दोन तरुण दरीत कोसळले. या दुर्घटनेत भावेश अहिरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मनीष मुठेकर हा तरुण जखमी- २०२० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावर नवीन वाट शोधताना जगप्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृत्यू- २०१८ मध्ये त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर गडावरही पाय घसरून दरीत पडल्याने एका महिलेचा मृत्यू