मुंबईकरांनो सावधान! सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस; हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 21, 2023

मुंबईकरांनो सावधान! सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस; हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट

https://ift.tt/uTpbg6S
मुंबई: मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मंगळवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. गेल्या काही तासांपासून मुंबई आणि ठाण्यात पाऊस लागून राहिला आहे. आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि अधुनमधून वीज चमकतनाही दिसत आहे. वाऱ्याचा जोरही जास्त असल्याने पावसाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. त्यामुळे कामावर जाण्यासाठी आज सकाळी घराबाहेर पडलेल्या चाकरमन्यांची चांगलीच तारांबळ उडताना दिसली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन्स काही मिनिटांच्या विलंबाने धावत असल्या तरी अद्याप रेल्वे वाहतुकीवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. सकाळी धावपळीच्या वेळेत चाकरम्यानांना छत्र्या घेऊन ऑफिस गाठण्याची तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील हवामान खात्याने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पुढील तीन ते चार तास पावसाचा जोर असेल. यावेळी ढगांचा गडगडाट आणि वीजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्याचा जोरही राहील. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात ३० ते ४० KMPH वेगाने वारे वाहतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यात पुढील काही तासांत पावसाची तीव्रता कायम राहील.दरम्यान, आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या पावसाच्या सरी अधुनमधून बरसत आहेत. मात्र, पावसाचा जोर आणखी वाढल्यास रस्त्यांवर पाणी साचून रस्ते वाहतूक मंदावण्याची शक्यता आहे. आकाशातील काळ्या ढगांची गर्दी पाहता पावसाच्या आणखी काही सरी बरसण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे मुंबई आणि ठाणेकरांना ऐन मार्च महिन्यात पावसाळी ऋतुचा अनुभव येत आहे.