
नवी मुंबई: महिला प्रीमियर लीग २०२३ तिसऱ्या लढतीमध्ये युपी वॉरयर्सने गुजरात जायंट्सवर थरारक असा विजय मिळवला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात युपीकडून ग्रेस हॅरिसने वादळी फलंदाजी केली. पुरुषांच्या IPLचा लाजवेल असा हा सामना झाला. युपी संघाला अखेरच्या षटकात १९ धावांची गरज होती. मैदानावर ग्रेस हॅरिसने ५ चेंडूत २४ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. अखेरच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ग्रेसने अशी कामगिरी केली जी अनेकदा पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये अनेकांना करता येत नाही. गुजरातकडून अखेरचे षटक ऑस्ट्रेलियाच्या एनाबेल सदरलँडने टाकले. या निर्णायक ओव्हरमध्ये गुजरातने मीस फिल्डिंग देखील केले. युपीने ही मॅच ३ विकेटने जिकंली आणि WPLची सुरुवात विजयाने केली. अशी झाली अखेरची ओव्हरपहिला चेंडू- ग्रेस हॅरिसने मिडविकेटच्या दिशेने षटकार मारलादुसरा चेंडू- सदरलँडने चेंडू वाइड टाकला त्यावर कर्णधार स्नेह राणाने रिव्ह्यू घेतला पण अर्थ अंपायरने मैदानावरील अंपायरचा निर्णय कायम ठेवला. दुसरा चेंडू- ग्रेस हॅरिसने मिडविकेटच्या दिशने चेंडू फ्लिक केला आणि दोन धावा काढल्या. गुजरातला नॉन स्ट्रायकरवर असलेल्या सोफी एक्लेस्टोनला धावबाद करण्याची संधी होती मात्र सदरलँडला चेंडू कलेक्ट करता आला नाही. तिसरा चेंडू- ग्रेस हॅरिसने चौकार मारलाचौथा चेंडू- यावेळी ग्रेस हॅरिसने वाइडसाठी डीआरएस घेतला. अंपायरचा निर्णय बदलावा लागला. चौथा चेंडू- ग्रेस हॅरिसने चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळला. गुजरातच्या खेळाडूने खराब फिल्डिंग केली आणि युपीला चौकार मिळाला. पाचवा चेंडू- ग्रेस हॅरिसने फुट टॉस चेंडूवर षटकार मारला आणि एक चेंडू राखून सामना जिंकला. ग्रेस हॅरिसने जेव्हा फलंदाजीला उतरली होती तेव्हा युपीने ८६ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. विजयाचे आव्हान अशक्य नसले तरी अवघड होते. अशाच ग्रेसने धमाकेदार फलंदाजी केली. तिने २२६.९२च्या स्ट्राइक रेटने फक्त २६ चेंडूत नाबाद ५९ धावा केल्या. यात ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकात ६ बाद १६९ धावा केल्या होत्या. युपीने विजयाचे लक्ष्य १ चेंडू राखून पार केले. वादळी फलंदाजीने संघाला विजय मिळवून देणाऱ्या ग्रेस हॅरिसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.