
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईखासगी रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा कामा या सार्वजनिक रुग्णालयामध्ये गरजूंना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिला दिनापासून त्याची सुरुवात होणार आहे. त्यामध्ये आयव्हीएफ केंद्रासह स्तनांच्या कॅन्सरचे योग्यवेळी निदान करण्याच्या सुविधेचाही समावेश आहे. नैसर्गिक, तसेच इतर काही कारणांमुळे गर्भधारणा न होणाऱ्या जोडप्यांसाठी या सुविधेची मदत होईल.राज्यातील सार्वजनिक रुग्णालयातील हे पहिले आयव्हीएफ केंद्र असणार आहे. तसेच स्तनांच्या कॅन्सरचे योग्यवेळी निदान करण्यासाठी प्रतिबंधात्मक ऑन्कोलॉजी युनिटचीही सुरुवात करण्यात येणार आहे. या ओपीडीमध्ये कॅन्सर प्रतिबंध करण्यासह त्याचे योग्यवेळी निदान कसे करावे, यासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. पॅप स्मिअरसारख्या चाचण्यांसह गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे निदान करणाऱ्या चाचण्याही येथे उपलब्ध असतील. मंगळवारी, शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुख्य ओपीडी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही सुविधा उपलब्ध असेल. रुग्णालयामध्ये लहान मुलांवरील वैद्यकीय उपचारांसाठी विशेष शाखा तयार करण्यात आली आहे. त्यात एक स्थिर बालरोग विभाग असेल, तर दुसऱ्या अतिदक्षता विभागामध्ये गंभीर स्वरूपाच्या बालरुग्णांवर वैद्यकीय उपचार दिले जातील, असे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे. विशेष बाह्यरुग्ण विभागकॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन स्तनांच्या विविध रोगांचे तपशीलवार मूल्यांकन, निदान आणि उपचारासाठी एक विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येत आहे. प्रत्येक बुधवारी दुपारी साडेबारा ते दोन वाजेपर्यंत मुख्य बाह्यरुग्ण विभागाच्या बाह्य रुग्ण क्रमांक सातमध्ये ही वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे.