
भंडारा : भंडारा शहरातील एका डॉक्टरने स्वतःच्या लग्नाच्या आदल्या दिवशी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूर येथे मेयो रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या युवा डॉक्टरने टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेमुळे लग्नघरात असलेल्या आनंदाच्या वातावरणावर शोककळा पसरली आहे.भंडारा शहरात स्नेहनगर येथे राहणाऱ्या चव्हाण कुटुंबात गेल्या दोन दिवसांपासून पाहुण्यांची रेलचेल सुरु होती. चार एप्रिलला ३५ वर्षीय डॉ. कुणाल भाऊराव चव्हान याचं लग्न ठरलं होतं. दोन तारखेला मेहंदीचा कार्यक्रम गाजावाजात पार पडला. सोमवारी ३ तारखेला हळद, तर मंगळवारी ४ तारखेला लग्न लागणार होतं. मात्र सोमवारी सकाळी १०.३० वाजताच घरात रडण्याचे सूर ऐकू येऊ लागले. मेहंदीने रंगलेल्या हातानेच डॉक्टरने हळदीच्या दिवशीच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. डॉक्टरच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. डॉ. कुणाल भाऊराव चव्हान (रा. स्नेहनगर, तकिया वॉर्ड) नागपूरमधील मेयो रुग्णालयात कर्तव्यावर होता. जानेवारी महिन्यात डॉ. कुणालचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील दंत वैद्यकीय तरुणीशी लग्न जुळले. चार एप्रिलला लग्नाची तारीख ठरली. चव्हान कुटुंबाकडे दोन एप्रिलला मेहंदीचा कार्यक्रम झाला. तीन एप्रिलला हळद, चार एप्रिलला नागभीड येथे लग्नसोहळा आणि पाच एप्रिलला भंडारा मध्ये स्वागत समारंभ असे कार्यक्रम ठरले होते. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. सोमवारी सकाळी झोपून उठल्यानंतर कुणालने चहा घेतला आणि परत आपल्या खोलीत गेला. परंतु, बराच वेळ तो बाहेर न आल्यामुळे त्याच्या वडिलांनी खोलीत जाऊन बघितले तर त्यांना मुलगा पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत आढळून आला. कुटुंबाने दोरी कापून डॉक्टरला खाली उतरविले. घटनेची माहिती भंडारा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर सायंकाळी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर कुणालचे वडील हे निवृत्त अधिकारी होते तर आई ही शिक्षिका आहे. कुणाल हा अभ्यासात हुशार. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्याने डॉक्टर बनण्याचे स्वप्न बघितले. आई-वडिलांनीही त्याच्या स्वप्नापूर्तीसाठी पूर्ण प्रयत्न केले. डॉक्टर झाल्यानंतर कुणालने लग्न करावे, अशी कुटुंबाची इच्छा होती. खरं तर लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. असंच आनंदी वातावरण मागील दोन दिवसांपासून चव्हान कुटुंबियांच्या घरी होता. मात्र एका हुशार डॉक्टरने लग्नाच्या आदल्या दिवशी एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलल्याने आनंद उत्सव साजरे करणारे घर क्षणात शोकसागरात बुडाले. दुसरीकडे सुखी संसाराची स्वप्नं रंगवणाऱ्या वधूच्या आशा-आकांक्षा क्षणार्धात भंग झाली.