
अशोकनगर: लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधू पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील अशोकनगर येथे ही घटना घडली. ही नववधू फक्त पळून गेली नाही तर ती घरातील दागिने आणि रोख रक्कम चोरुन पळाली आहे. या चोरट्या नववधूने आधी सासरच्यांना जेवणातून काही औषध देत बेशुद्ध केलं. मग तिने घरातील दोन लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी सासरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. हे प्रकरण अशोकनगर येथील कचनार पोलीस स्टेशन हद्दीतील सेमराहाट गावातील आहे. येथील अनिल भार्गव यांचा मुलगा जमनालाल भार्गव याचा १५ एप्रिल रोजी शहरातील राजराजेश्वर मंदिरात विवाह होता. ओडिशात राहणाऱ्या मुलीशी त्याचा विवाह झाला होता. घरात लग्न झाल्याने आनंदाचे वातावरण होते. पण, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.जेवणातून औषध देत केलं बेशुद्धशुक्रवारी लग्नघरातील काही जण पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी तक्रार दिली, की नववधून जेवणात बेशुद्धीचं औषध मिसळून त्यांना दिलं. त्यानंतर जेव्हा घरातील सर्वजण बेशुद्ध झाले, तेव्हा ती घरात ठेवलेली रोख रक्कम आणि सोनं-चांदीचे दागिने घेऊन गायब झाली. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की ते दोन दिवस बेशुद्ध होते आणि शुद्धीवर आले तेव्हा त्यांची सून घरी नव्हती. त्यांनी तिचा खूप शोध घेतला पण ती कुठेही सापडली नाही. तसेच, घरातून पैसे आणि दागिने गायब असल्याचं आढळून आलं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पती आणि नववधूचा मोबाईलही गायब आहे. दोन्ही मोबाईल बंद असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. गुना येथील रहिवासी कमलेश जोशी याने कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगून या मुलीशी लग्न लावून दिल्याचं सांगितले जात आहे. सध्या तिचा मोबाईलही बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.