
अकोला : विदर्भातील कापूस पंढरी म्हणून ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात कापसाचे दर मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस घसरत आहेत. सर्वच बाजारात कापसाचे आवक वाढल्याने कापसाचे दर खाली येत असल्याचं कृषी बाजार अभ्यासक सांगतात. या बाजारात ८ एप्रिल (शनिवार) रोजी कापसाला सर्वात जादा दर म्हणजे ८ हजार ८४० रूपये प्रति क्विंटल मागे मिळाला होता. मात्र, त्यानंतर कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र आहे. परंतु, मागील सतरा दिवसांत ३५५ रूपयांनी कापसाचे दर खाली आलेत. त्यामुळ आज मंगळवार रोजी ८ हजार पासून ८ हजार ४८५ रूपये क्विंटल मागे कापसाला भाव मिळाला. सध्या देशात कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कापसाच्या दरात मोठी घसरण होत असल्याचं चित्र आहे. मागील हंगामाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात कापसाच्या भावात प्रतिक्विंटल चार ते पाच हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं असल्यानं आता बचावलेल्या पिकांना कृषी बाजारात कापासला अपेक्षानुसार भाव नाही, त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रंचड निराशा पसरली आहे.या हंगामात कापसाला सरासरी ८ रुपयांच्या घरात भाव मिळत आहे, त्यामुळे मार्च अखेर अथवा एप्रिल महिन्यात कापसाला अपेक्षेनुसार भाव मिळेल या आशेने शेतकऱ्याने आपला कापूस घरातच ठेवणं पसंत केलं होतं. मात्र, एप्रिल महिना संपत आला आला तरी कापसाचा दर वाढण्याएवजी खाली आला आहे. खरिप हंगाम जवळ येतोय, पेरणी साठी लागणारा खर्च तसेच बी बियाणे इतर गोष्टीसांठी पैसा कुठून मोजावा हां प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. सद्यस्थितीत कापसाला आठ हजार पाचशे रुपयांच्या वर भाव आहे. हा कापसाचा भाव अधिक खाली येणार या भीतीने शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी बाजारात दाखल केला आहे. आज सर्वच बाजारात आवक जास्त असल्यामुळे त्याचा परिणाम कापसाच्या दरावर दिसून येत आहे, असे कृषी बाजार समितीचे अभ्यासक सांगतात. अकोट कृषी बाजार समितीमध्ये ८ एप्रिल (शनिवार) रोजी कापसाला एप्रिल महिन्यातील सर्वात जादा दर होता, तो म्हणजे ८ हजार २०० ते ८ हजार ८४० रूपये प्रति क्विंटल प्रमाणे होता. या दिवशी १ हजार ८९० इतकी कापसाची आवक झाली होती. मात्र, त्यानंतर दिवसेंदिवस कापसाच्या दरात घसरण होत असल्याचं दिसून येत होतं. सोमवारी ८ हजार पासून ८ हजार ५४५ रूपये इतका दर मिळाला होता. आज मंगळवारी पुन्हा कापसाचे दर ६० रुपयांनी खाली घसरले अन् ८ हजार पासून ८ हजार ४८५ रूपये क्विंटल मागे कापसाला भाव मिळाला. परंतु, आज कापसाची आवक जादा होती ती म्हणजे ३ हजार २०० क्विंटल इतकी. दरम्यान कृषी बाजारांच्या सूत्रांच्या माहितीनुसार जशी जशी बाजारात कापसाची आवक वाढत जाईल तसे कापसाचे दर खाली येतील, असे सांगण्यात येत आहे.