
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः आपली लोकल कुठे पोहोचली, किती वेळात लोकल स्थानकात येणार याची माहिती आता पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनाही आपल्या मोबाइलमध्ये पाहता येणार आहे. उद्या, बुधवारपासून यात्री अॅपमध्ये लोकलच्या सद्यस्थितीची माहिती देणारी यंत्रणा (लाइव्ह ट्रॅकिंग सिस्टीम) कार्यान्वित करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.पश्चिम रेल्वेने आपल्या ताफ्यातील सर्व रेल्वेगाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणांची चाचणी यशस्वी झाल्यामुळे प्रवाशांना ही सुविधा वापरण्यासाठी खुली करण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे लोकल कोणत्या स्थानकात येईल आणि किती वेळात पोहोचेल हे प्रवाशांना मोबाइलवर समजू शकणार आहे.पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील रेल्वेसंबंधी ताज्या घडामोडी, ब्लॉकसंबंधी घोषणा, प्रमुख रेल्वे स्थानकांचे नकाशे ही माहितीदेखील अॅपमध्ये उपलब्ध होणार आहे. दिव्यांग प्रवाशांसाठीही हे अॅप सुलभ असून गुगल असिस्टंटचा वापर करण्याची मुभा प्रवाशांना मिळणार आहे.१३ जुलै, २०२२पासून मध्य रेल्वेने यात्री अॅपवरही सुविधा सुरू केली आहे. मध्य रेल्वेवरील मुख्य, हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये ही सुविधा यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आलेली आहे.