
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः खासगी व्यक्तींना त्यांच्या प्रतिनिधींमार्फत ऑनलाइन किंवा परवानाधारक मुद्रांक पेपर विक्रेत्यांकडून मुद्रांक पेपर खरेदी करता येणार नाही. मुद्रांक खरेदी करायचा असल्यास स्वत: संबंधित विक्रेत्याकडे जावे लागेल. या निर्णयाला विरोध करत मुंबईतील मुद्रांक विक्रेत्यांनी सोमवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे.ऑनलाइन व परवानाधारक दुकानांतून मुद्रांक पेपर विक्रीत सरकारने ठरवून दिलेल्या मोबदला शुल्कापेक्षा अधिक पैसे ग्राहकांकडून आकारत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने खासगी व्यक्तींना प्रतिनिधींमार्फत मुद्रांक न देता ती व्यक्ती स्वत: विक्रेत्याकडे मुद्रांक खरेदी करण्यासाठी येणे बंधनकारक असल्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुंबईपुरता मर्यादित आहे.‘सन १९८२मध्ये परवाने देण्यात आल्यापासून जी पद्धत सुरू होती त्याचीच परवानाधारक अंमलबजावणी करत आहेत. मुद्रांक अधिनियम खंड आठमध्ये देण्यात आलेल्या नियमानुसारच मुद्रांक विक्रेते प्रतिनिधीची सही किंवा अंगठा घेतात. अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून असे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे मुंबईतील परवानाधारक विक्रेते व नागरिक अडचणीत आले आहेत’, असा दावा मुद्रांक विक्रेता संघ, मुंबईचे अध्यक्ष अशोक कदम यांनी केला आहे.नवीन आदेशामुळे सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मंत्री किंवा अन्य बड्या व्यक्तीस प्रत्यक्ष जाऊन मुद्रांक घ्यावे लागेल. राज्य सरकारने एका प्रकरणात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे सांगितले आहे की, सध्याच्या नियमाच्या तरतुदीनुसार मुद्रांक खरेदी करणारी व्यक्ती किंवा संस्था आपले मुद्रांक दुसऱ्यामार्फत खरेदी करू शकतात. नवीन आदेशात परवानाधारकाच्या कामाबद्दल विसंगती मांडण्यात आली असून हे कार्यालयीन आदेश चुकीचे आहेत, असे याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले आहे.