
मुंबई : बाळाला स्वतःपासून दूर करणे हे कोणत्याही मातेसाठी काळजावर दगड ठेवण्यासारखे आहे. मात्र, चेंबूरच्या ‘त्या’ मातेने काळजावर दगड ठेवला... त्याला कारणही तसेच होते. पाच मुलांच्या पाठीवर झालेल्या सहाव्या मुलीचा सांभाळ करणे तिला अशक्य होते. त्यातच पतीनेही साथ सोडली होती. आपले मूल कुणाच्या तरी पदरात सुरक्षित जीवन जगावे म्हणून, ही माता अपत्य नसलेल्या दाम्पत्यास मुलीला देण्यास तयार झाली. यातून तिला काही पैसेही मिळाले. मात्र, हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसही गहिवरले. पण, कायदेशीर तरतुदीनुसार अशाप्रकारे मुलाची विक्री बेकायदा असल्याने त्यांनी मातेसह मुलीच्या विक्रीसाठी मदत करणाऱ्या चौघांना अटक केली.राजावाडी रुग्णालयात शमिमा शाह या महिलेने पाच मुलांनंतर १७ सप्टेंबर २०२२ रोजी सहाव्या मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर शमिमाने पतीला फोन करून माहिती दिली. मात्र, पतीकडून काहीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तो दुसऱ्या पत्नीकडे राहत असल्याचे तिला समजले. सहावी मुलगी जन्मल्यानंतर आजारी होती. तिचा सांभळ करणे कठीण असल्याचे शमिमाने तिच्या मैत्रिणीला सांगितले. मैत्रिणीने आणखी दोघांशी संपर्क केला. या दोघांनी हैदराबाद येथील एका दाम्पत्याला अपत्य होत नसून, दोघेही बाळाच्या शोधात असल्याचे त्यांनी सांगितले. या दाम्पत्याशी संपर्क साधून त्यांना मुलीबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी मुलीला स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर शमिमा आणि इतर तिघे या मुलीला घेऊन हैदराबाद येथे घेऊन गेले आणि उपचारासाठी तेथील रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून ही मुलगी हैदराबाद येथील दाम्पत्याच्या ताब्यात होती. मार्च २०२३मध्ये शमिमाचा पती पुन्हा तिच्याकडे आला आणि सहाव्या मुलीबाबत विचारणा केली. याबाबत समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्याने बाल कल्याण समितीकडे तक्रार केली. या समितीने पोलिसांना चौकशीच्या सूचना दिल्यानंतर या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासामध्ये मुलीला हैदराबाद येथे विक्री केल्याचे समोर येताच, पोलीस मुलीला ताब्यात घेण्यासाठी हैदराबादला गेले. मात्र, त्या मुलीचा सुस्थितीत, ऐषआरामात सांभाळ होत असल्याचे पाहून पोलिसही अवाक् झाले. पण कायदा कठोर असल्याने, त्यांनी कारवाई करीत मुलीला ताब्यात घेऊन मुंबईला आणले. त्यानंतर या प्रकरणी शमिमासह चार जणांना अटक करण्यात आली.