
जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात नगरदेवळा येथील पिता पुत्रावर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात पित्याचा मृत्यू झाला असून जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैय्यद सबदर सैयद इस्माईल (वय ५८ वर्ष) असे मयत वडिलांचे नाव आहे. मुलगा आबिद सैय्यद सबदर हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.याबाबत सविस्तर वृत्त असे की, सैय्यद सबदर सैयद इस्माईल व त्यांचा मुलगा आबिद सैय्यद सबदर हे दोघे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास रोजंदारीचे काम करून बनोटी शिंदोळ मार्गाने परतत असताना शिंदोळ गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या झाडावर बसलेल्या मधमाश्या अचानक उठल्या. अचानक झालेल्या हल्ल्यात सैयद सबदर सैयद इस्माईल यांच्या तोंडाला मधमाश्या चावल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा आबीद सैयद सबदर यालाही माशांनी चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्याने परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. व जखमी आबीद याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावर उपचार सुरू आहेत.