
: महाराष्ट्रातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीचा नावलौकिक राज्यभरात आहे. माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या काळात गावाची राज्यभर चर्चा सुरु होती. ग्रामविकासाचा पाटोदा पॅटर्न देखील विविध ग्रामपंचायतींसाठी आदर्शवत ठरला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांसाठी २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीनं देशपातळीवर झेंडा रोवला आहे. पाटोदा ग्रामपंचायतीनं देशपातळीवर कार्बन न्युट्रल ग्रामपंचायत श्रेणीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. आज झालेल्या सोहळ्यात नॅशनल पंचायत अवार्ड कार्बन न्युट्रल ग्रामपंचायत पुरस्कार पाटोदा ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला आहे. औरंगाबाद - जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत पाटोदा -गंगापूर नेहरीला देशातून दुसऱ्या क्रमांकाचा नुकताच नँशनल पंचायत अवार्ड कार्बन न्युट्रल ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर झाला होता.आज नवी दिल्ली येथे हा पुरस्कार महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू,केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री गिरीराज सिंह,केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना,पंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे,सरपंच जयश्री किशोर दिवेकर,उपसरपंच कपिंद्र पेरे, ग्रामविकास अधिकारी पुंडलिक पाटील, दिपाली उद्धव पेरे व संजय सोनवणे यांनी पुरस्कार स्वीकारला. पाटोदा - गंगापूर नेहरी ही ग्रामपंचायत राज्यातच नव्हे तर देशपातळीवर तसेच जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारी ठरलेली आहे.