
पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. या वाढत्या गुन्हेगारीत अवैध देहविक्रीचं मोठं रॅकेट पुण्यात सुरू आहे. त्यामुळेच स्पा सेंटर चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. या स्पा सेंटरच्या आडून होत असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश पुणे पोलीस करत आहेत. काही दिवसांपूर्वी वारजे-माळवाडी येथे ओम स्पावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला होता. त्यानंतर आता आणखी एका मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केला आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फातिमानगर भागातील क्लिओज स्पा अँड सलून या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करत पाच महिलांची सुटका केली आहे. तर श्रीधर मोहन साळुंखे (वय ४२, पवळे चौक कसबा पेठ) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे. फातिमानगर परिसरातील क्लिओज स्पा अँड सलून याठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली अवैध प्रकारे देहविक्री व्यवसाय सुरू होता. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने याठिकाणी छापा टाकला. छापा टाकल्यावर पोलिसांना सदर ठिकाणी ५ महिला देहविक्री करत असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी तातडीने या महिलांची सुटका केली आणि स्पा मालक श्रीधर साळुंखे याला अटक केली. अवैध प्रकारांना आळा घालण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. आरोपी साळुंखे याने पैशाचे आमिष दाखवून या महिलांना या स्पा सेंटरमध्ये काम दिले होते. तर आणखी पैशाचे आमिष दाखवत तो या पाचही महिलांकडून देहविक्री करून घेत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी या पाच महिलांची सुटका केली आहे. आणि स्पा मालक श्रीधर साळुंखे याला अटक केली आहे. वानवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.