नवी मुंबईत एका कोंबडीमुळे १९ वर्षीय तरुणाचा जीव गेला, चोरांकडून कुऱ्हाडीचे घाव, तडफडत जीव सोडला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 2, 2023

नवी मुंबईत एका कोंबडीमुळे १९ वर्षीय तरुणाचा जीव गेला, चोरांकडून कुऱ्हाडीचे घाव, तडफडत जीव सोडला

https://ift.tt/vXOGzNt
: नवी मुंबई शहरामध्ये गुन्हेगारीचे क्षेत्र वाढत चालले आहे. नेरुळमध्ये बांधकाम व्यवसायिकाची हत्या त्यानंतर पनवेलमध्ये बांधकाम व्यवसायिकाच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलेवर गोळीबार असे एक ना अनेक प्रकार सर्रासपणे घडत आहेत. त्यामुळे नवी मुंबई पनवेलमध्ये गुन्हेगारी क्षेत्राला आळा बसणार कधी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे. त्यातच आता जीभेचे चोचले पुरविण्याच्या नादात २९ मार्चला रात्रीच्या वेळी पनवेल शिवकर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये एका १९ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. २९ तारखेला रात्री दोन वाजताच्या सुमारास तीन जण आपल्या जीभेचे चोचले पुरविण्यासाठी विकत घेता येत नाही म्हणून कोंबडी चोरण्यासाठी शिवकर गावात शिरले. रात्रीच्या दोन वाजता हे तिघेजण गावाकडील बाहेर जाळ्यात ठेवल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या शोधात होते. त्या शोधात ते गावात राहणाऱ्या १९ वर्षीय विनय पाटील या तरुणाच्या घराजवळ गेले. घराच्या दरवाजाची कडी लावली नसल्याने चोरांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आत डोकावून बघितल्यावर त्यांची घरातल्या काही वस्तूंवर नजर पडली. त्या वस्तू त्यांनी चोरण्याचा प्रयत्न केला, असता झोपलेल्या १९ वर्षीय विनयला जाग आली. चोरांच्या लक्षात येताच त्यांनी पळ काढला.मात्र, विनयने उठून घरात घुसलेल्या चोरांचा कुऱ्हाड हाती घेऊन पाठलाग केला. गावाच्या बाहेर काही अंतरावर जाताच त्या तिघांसोबत त्याची झटापट झाली. अशात त्यांनी विनयवर त्याच कुऱ्हाडीने वार केले. यात विनय गंभीर जखमी होऊन खाली पडला. यानंतर चोरांनी तिथूनही पळ काढला. काही वेळाने घरातील इतरांना गाढ झोपेतून जाग आली. विनय घरात न दिसल्याने त्यांनी विनयला शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना गंभीर जखमी अवस्थेत असलेला विनय सापडला. त्यानंतर त्यांनी त्याला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी विनयला मृत घोषित केले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.सर्व बाजूने तपास करताना पोलिसांनी तेथीलच एका बेकरीत काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता याच तिघांनी विनयला मारले असल्याचे निष्पन्न झाले. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेले आरोपी यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले आहे. पोलीस त्यांची पोलीस कस्टडी मागून आणखी काही तपासात निष्पन्न होते का, याचा शोध घेत आहे. मात्र, एका कोंबडीच्या चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांकडून एका तरुणाचा नाहक जीव गेल्याने खळबळ उडाली असून, पनवेल परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. जिभेचे लाड पुरविण्याच्या नादात नाहक एका तरुणांचा जीव घेतला जात असेल तर अशा आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी परिसरातून होत आहे.