दुबईहून ३ दहशतवादी मुंबईत, घातपाताच्या तयारीत; पोलिसांना फोन, तपासताच धक्कादायक कटाचा उलगडा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 15, 2023

दुबईहून ३ दहशतवादी मुंबईत, घातपाताच्या तयारीत; पोलिसांना फोन, तपासताच धक्कादायक कटाचा उलगडा

https://ift.tt/NsVaIUL
मुंबई: दुबईहून तीन दहशतवादी मुंबईत आले असून, घातपात करण्याच्या तयारीत आहेत, या दूरध्वनीमागील कटाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. चौकशीअंती खोटी माहिती देणाऱ्या यासिन सय्यद याला महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने अहमदनगर येथून अटक केली आहे. गावातील मालमत्तेच्या वादातून चुलत भावाला गोवण्यासाठीच हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये शुक्रवारी ७ एप्रिल रोजी दूरध्वनी आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने राजा ठोंगे बोलत असल्याचे सांगत दुबईहून मुंबईत तीन दहशतवादी आले असून, त्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याची माहिती दिली. तिघांपैकी एकाचे नाव मुजीब सय्यद असल्याचे सांगत त्याने काही मोबाइल क्रमांक दिले. तसेच त्यांच्या खासगी वाहनाचा क्रमांकही दिला. पोलिसांनी या माहितीची गंभीर दखल घेतली. राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क झाली. दूरध्वनी करणाऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलीस मुजीबपर्यंत पोहोचले. मात्र, संशयास्पद असे काहीच आढळले नाही. खोटी माहिती दिल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांप्रमाणे महाराष्ट्र एटीएसच्या राज्यातील पथकाने खोटी माहिती देणाऱ्याचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फूटेज तसेच इतर गोपनीय माहितीच्या आधारे एटीएसच्या नाशिक युनिटच्या पथकाने अहमदनगर येथून यासीन सय्यद याला अटक केली. चौकशीमध्ये मुजीब आणि यासिन दोघे चुलतभाऊ असून, त्यांचा अहमदनगरच्या भवानीनगरात साडेपाच गुंठ्याचा वडिलोपार्जित सामायिक भूखंड असल्याचे स्पष्ट झाले. या भूखंडाच्या मालकीवरून दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यामुळे मुजीब आणि त्याच्या कुटुंबीयांमागे पोलिसांच्या कारवाईचा ससेमिरा लागावा, यासाठीच यासीनने फोन करून खोटी माहिती दिल्याचे तपासातून समोर आले.