
मुंबई : खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी कर्ज देणारी वित्तीय संस्था एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतलेल्या लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी कर्ज देणाऱ्या HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने निवडक कालावधीसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये ०.८५ टक्क्यांपर्यंत कपात केली असून नवे दर १० एप्रिलपासून लागू झाले आहेत.भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अलीकडे रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. विशेष म्हणजे मे २०२२ पासून आरबीआयने रेपो दरात वाढ करण्याची आक्रमक भूमिका घेतली होती, मात्र यंदा त्यांनी रेपो दरवाढीला तूर्तास ब्रेक लावला आहे. यानंतर MCLR मध्ये कपात करणारी एचडीएफसी ही देशातील पहिली बँक आहे. तथापि, MCLR मधील कपातीचा एचडीएफसीकडून गृहकर्ज घेणार्यांना फायदा होणार नाही. कारण बहुतेक गृहकर्ज एचडीएफसी लिमिटेडकडून घेतले जातात. ज्यांची कर्जे MCLR शी जोडलेली आहेत फक्त त्यांनाच फायदा होईल. यामध्ये काही जुनी वैयक्तिक आणि वाहन कर्जे (फ्लोटिंग रेट लोन) समाविष्ट आहेत. या कपातीनंतर, रात्रीचा MCLR ७.८० टक्क्यांवर आला, जो पूर्वी ८.६५% होता. त्याचप्रमाणे,एक महिन्याचा MCLR देखील ८.६५ टक्क्यांवरून ७.९५ टक्क्यांवर आला आहे. त्यात ०.७० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. तीन महिन्यांचा MCLR ०.४०% ने कमी करण्यात आला आहे. तो आता ८.७ टक्क्यांवरून ८.३ टक्क्यांवर आला आहे. एचडीएफसी बँकेने सहा महिन्यांचा MCLR ०.१० टक्क्याने कमी करून ८.७% केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) २०१६ मध्ये MCLR प्रणाली सुरू केली, जो वित्तीय संस्थेसाठी अंतर्गत बेंचमार्क आहे. कर्जाचा किमान व्याजदर MCLR प्रक्रियेत निश्चित केला जातो. MCLR हा किमान व्याजदर आहे ज्यावर बँक कर्ज देऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) ही भारतीय रिझर्व्ह बँकेने सेट केलेली एक पद्धत आहे जी कर्जावरील व्याजदर ठरवण्यासाठी व्यापारी बँका वापरतात. रेपो दरातील बदलामुळे एमसीएलआरवरही परिणाम होतो.