
मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आपल्या करोडो ग्राहकांना विमा पॉलिसी प्रदान करते, ज्यामध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. मात्र, अनेकदा असेही पाहायला मिळाले आहे की पॉलिसीधारकांना आपण घेतलेल्या पॉलिसींचा विसर पडतो. जर तुम्हीही एलआयसी पॉलिसीधारक असाल किंवा कधी भूतकाळात पॉलिसी घेतली असेल, तर तुमची काही देय शिल्लक आहे की नाही हे तुम्ही घरबसल्या सहज जाणून घेऊ शकता. दावा न केलेली रक्कम किंवा थकबाकी ही पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास, पॉलिसीचा दावा न केल्यास किंवा नुकसानभरपाईचा दावा न केल्यास विमा कंपनीकडे जमा असते.अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देखील १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सुमारे ३५,००० कोटी रुपयांचे वारस शोधण्यासाठी एक नवीन केंद्रीकृत पोर्टल तयार करण्याची घोषणा केली. मात्र, याबाबत सरकारी विमा कंपनी 'लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ही मागे नाही. LIC कडेही जवळपास २१ हजार ५०० कोटी रुपये आहेत, ज्याच्यावर कोणीतही दावा केलेला नाही. सध्याच्या काळात LIC कडील दावा न केलेल्या रकमेबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. परंतु जेव्हा कंपनीने आपला IPO लॉन्च केला, तेव्हा त्यांनी कागदपत्रांमध्ये माहिती दिली होती की सप्टेंबर २०२१ पर्यंत २१,५३९ कोटी रुपयांचा दावा न केलेला निधी आहे. अशा स्थितीत, जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की तुमची स्वतःची पॉलिसी दावा केलेली नाही, तर इथे आपण त्याबाबत प्रोसेस जाणून घेऊ.LIC कडील दावा न केलेली रक्कम कशी शोधायचीआयुर्विमा महामंडळाकडील दावा न केलेली रक्कम शोधण्यासाठी एलआयसीने स्वतःच्या पोर्टलवर एक विशेष सुविधा दिलेली आहे. येथे तुम्ही तुमच्या पॉलिसीचे तपशील सांगून दावा न केलेली रक्कम शोधू शकता. जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस...
- सर्वप्रथम तुम्ही एलआयसीच्या साइटवर जा.
- यानंतर तुम्ही ग्राहक सेवा विभागावर क्लिक करा.
- ग्राहक सेवा विभागात ‘Unclaimed Amount of Policyholders’ वर क्लिक करा.
- या लिंकवर क्लिक केल्यावर एक वेगळी विंडो दिसेल, जिथे तुमच्या पॉलिसीशी संबंधित माहिती प्रविष्ट करा.
- इथे एलआयसीचा पॉलिसी क्रमांक, पॉलिसीधारकाचे नाव, त्याची जन्मतारीख आणि पॅन कार्ड क्रमांक प्रविष्ट करा.
- यानंतर, तुम्ही सबमिट वर क्लिक करताच तुमच्यासमोर दावा न केलेल्या रकमेचा तपशील उघडेल.