
उल्हासनगर: उल्हासनगरमधील जुगार क्लब चालकाची हत्या करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पैशांच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे यानंतर समोर आले आहे. उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील जय जनता कॉलनीत जुगाराचा अड्डा चालवणारा शब्बीर शेख याची २६ मे रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. तर त्याच्या भावावरही जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर उल्हासनगर परिमंडळ ४ मधील ८ पोलीस स्टेशन आणि ठाणे गुन्हे शाखा यांच्याकडून या हत्या प्रकरणाचा तपास सुरू होता. ही हत्या विक्रम कवठणकर, दिनेश कवठणकर, जयेश साळुंखे, विजय रुपानी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं. यानंतर ठाणे गुन्हे शाखेने यापैकी दिनेश कवठणकर याला बेड्या ठोकल्या. तर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचचे उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांनी विक्रम कवठणकर, प्रशांत तायडे आणि बोराळे या तिघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता जुगार चालक शब्बीर शेख यांच्यासोबत पैशांच्या देवाण-घेवाणीवरून आपले यापूर्वी वाद झाले होते आणि त्याच वादातून आपण ही हत्या केल्याची कबुली या सर्वांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर काही आरोपी अजूनही फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती उल्हासनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली आहे.