
लखनऊ: आई लेकराला बोट धरुन चालून शिकवते. मात्र हेच लेकरु बोट सोडून आईला सोडून दूर निघून गेलं तर? एका आईवर असा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. आईसोबत असलेली चिमुकली तिचं बोट सोडून काही अंतरावर गेली. तितक्यात रस्त्यावरुन भरधाव बस गेली. चिमुकली बसच्या खाली आली. क्षणार्धात आईनं लेक गमावली. आईनं डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू पाहिला. तिनं हंबरडा फोडला. आक्रोश करणारी महिला बेशुद्ध पडली. तिला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. शनिवारी सकाळी दोन वर्षांची परी तिची आई नीलमसोबत आजीच्या घरी निघाली होती. परीच्या काकांनी त्यांना बिजनौर बस स्थानकावर सोडलं. तेव्हा परीनं केळं खाण्याचा हट्ट धरला. मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी नीलम बस स्थानकात उतरल्या आणि केळं खरेदी करण्यासाठी स्थानकाच्या गेटवर गेल्या. नीलम केळं खरेदी करत होत्या. तितक्यात नजिबाबाद आगाराची बस बाहेर पडली. चिमुकल्या परीनं आईचा हात अलगद सोडला. ती काही अंतरावर गेली. त्याचवेळी बस तिथे आली. परी बसच्या मागच्या चाकाखाली सापडली. परीला वाचवण्यासाठी नीलम धावल्या. मात्र तोपर्यंत अनर्थ घडला होता. परीचा निष्प्राण देह रस्त्यावर पडला होता. नीलम यांनी आक्रोश केला. त्या धाय मोकलून रडू लागल्या. घडलेला प्रसंग पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या अपघाताची नोंद करुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.