ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सिव्हिल इंजिनीअर अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा ठाणे पोलिसांनी पुन्हा तपास करत तीन महिन्यांच्या आत न्यायालयात आरोपींविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. तपासामध्ये आणखी दोन पोलिसांची नावे समोर आली असून या गुन्ह्यात दोन नवीन कलमे वाढवण्यात आली, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. नवीन वाढलेली कलमे आणि पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या भक्कम तांत्रिक पुराव्यांमुळे या प्रकरणातील आरोपी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.घोडबंदर रोड परिसरात वास्तव्यास असलेले अनंत करमुसे यांनी तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टवरून ५ एप्रिल २०२० रोजी आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी करमुसे यांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून यामध्ये आव्हाड यांच्यासह एकूण १३ आरोपींना अटक झाली होती. आरोपींमध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. नंतर सर्वांना जामीन मिळाला. यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने गेल्याच महिन्यात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. मात्र, पोलिसांच्या तपासामध्ये त्रुटी असल्याने या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा, यासाठी करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने २४ फेब्रुवारी या प्रकरणाचा तीन महिन्यांमध्ये तपास पूर्ण करून न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर ठाणे पोलिसांनी तपास सुरू केला. साहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने करमुसे मारहाणप्रकरणाचा सखोल तपास करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीच्या दोन दिवस आधीच २२ मे रोजी ठाण्याच्या जेएमएफसी न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. जवळपास ४०० पानांचे दोषारोपपत्र होते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. परंतु, पोलिसांच्या तीन महिन्यांच्या या तपासामध्ये आणखी दोन पोलिसांची नावे समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पुरवणी दोषारोपत्रामध्ये या दोन पोलिसांसह आव्हाड आणि अन्य आरोपींची नावे आहेत. शिवाय या गुन्ह्यात कलम ३६४ (अ), १२० (ब) ही दोन कलमे वाढवण्यात आली, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. तांत्रिक पुरावे न्यायालयात सादरतपासामध्ये भक्कम असे काही तांत्रिक पुरावेही जमा करून हे पुरावे न्यायालयात सादर केल्याचे समजते. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. परिस्थितीजन्य पुरावे जमा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
https://ift.tt/msPNycv