
मुंबई: एकीकडे हिंदी टीव्ही इंडस्ट्री आदित्य सिंग राजपूत, वैभवी उपाध्याय आणि नितेश पांडे यांसारख्या स्टार्सच्या निधनाने हादरली आहे, तर दुसरीकडे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवरही दु:खाचा डोंगर कोसळला. भोजपुरी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष चंद्र तिवारी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. सोनभद्र येथील एका हॉटेलमधून त्यांचा मृतदेह सापडला आहे. रॉबर्ट्सगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक मनोज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष चंद्र तिवारी २४ मे रोजी सकाळी हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले.सुभाष यांच्या निधनाने संपूर्ण भोजपुरी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुभाष हे वाराणसीचे रहिवासी होते आणि चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने सोनभद्रमध्ये होते. सुभाष १२ मेपासून सोनभद्रमध्ये 'दो दिल बंधे एक डोरी से' या सिनेमाचे शूटिंग करत होते. त्यामुळे ते सोनभद्र याठिकाणीच एका खासगी हॉटेलमध्ये थांबलेले. त्यांच्यासोबत ४० जणांची टीमही होती. छातीत तीव्र कळ आल्याने शूटिंगनंतर हॉटेलमध्ये परतलेमनोज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. नंतर त्यांना बरे वाटल्यानंतर ते परतले आणि पुन्हा एकदा शूटिंगमध्ये व्यग्र झाले. २३ मे रोजी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालेले, शूट संपल्यानंतर संध्याकाळी सुभाष हॉटेलवर परतले होते आणि त्यानंतर ते त्यांच्या खोलीत गेले. मात्र २४ मे रोजी बुधवारी त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंतही खोलीचा दरवाजा उघडला नाही.दरवाजा तोडून मृतदेह काढला बाहेर त्यामुळे संशय आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती हॉटेल मालकाला दिली. मालकाने तात्काळ रॉबर्टगंज कोतवाली पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर दरवाजाच्या कडीजवळील भाग कापून पाहिले, तेव्हा सुभाष बेडवर पडल्याचं त्यांना दिसून आले. त्यानंतर तातडीने आतमध्ये गेल्यांनंतर सुभाष यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून सुभाष यांच्या मृत्यूचे कारणही शोधत आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहिली जात असून त्यानंतर उघडकीस येऊ शकेल की नेमका त्यांच्या मृत्यू कोणत्या कारणाने झाला.