
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : वर्षअखेरीस राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठींनी मॅरेथॉन बैठकांचा धडाका सुरू केला आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत तब्बल १० ते ११ तास विविध मुद्द्यांवर मंथन झाल्याची माहिती हाती आली आहे. भाजपमध्ये व्यापक संघटनात्मक बदलांची शक्यता असून, महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांच्यासह अनेक राज्यांतील संघटन नेते बदलण्याची तयारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले.अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा व राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत भाजपची उच्चस्तरीय बैठक सोमवारी रात्री उशिरा सुमारे चार तास आणि मंगळवारी सकाळपासून सहा तास चालली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत विविध राज्यांतील भाजप पक्षसंघटनेतील रिक्त पदे भरण्यावर चर्चा झाली. अनेक राज्यांत दीर्घकाळापासून असलेल्या पदाधिकाऱ्यांना बदलण्याबाबतही या बैठकीत गंभीरपणे चर्चा झाली. भाजप नेते व संघनेते यांच्यातही लवकरच संयुक्त बैठक होईल, अशीही माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’ला समजली आहे. सी. टी. रवी हे भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. मात्र, अलीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत संतोष यांच्यासह त्यांचीही भूमिका वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचाही मोठा प्रश्न असून, महाराष्ट्रासारख्या राज्यातील भाजप प्रभारी हे ‘दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सात दिवस’ काम करणारे, करू शकणारेच हवेत यावर भाजप नेतृत्वाचे एकमत झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत शहा यांनी चर्चा केली आहे. रवी यांना लवकरच महाराष्ट्राच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची शक्यता वर्तविली जाते.