
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिरवा कंदील दर्शविल्यानंतर संभाव्य मंत्र्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये चार मंत्री असले, तरी हा आकडा आता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.नाशिक जिल्ह्यातून शिंदे गटाकडून सुहास कांदे आणि भाजपकडून प्रा. देवयानी फरांदे किंवा डॉ. राहुल आहेर यांना मंत्रिमंडळात बढती दिली जाण्याची शक्यता आहे. धुळ्यातून जयकुमार रावल आणि जळगावमधून चिमणराव पाटील यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये शिवसेनेत बंड करीत थेट भाजपसोबत जात सरकार बनविले. शिवसेनेतील जवळपास ४० आमदार आणि १३ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत घरोबा केला होता. शिवसेनेतील हे बंड सर्वोच्च न्यायालय, तसेच केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले होते. शिवसेना कुणाची या वादात निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने सत्तांतराचा निकाल देताना शिंदे गटाने नियुक्त केलेले प्रतोद बेकायदेशीर ठरवत मुख्यमंत्री शिंदेंना अभय दिले होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने तरल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात शिंदे गटाचे नऊ, तर भाजपचे नऊ असे १८ मंत्री झाले होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबात सध्या खलबते सुरू झाली असून, मुख्यमंत्री शिंदेंनी सोमवारी दिल्लीत गृहमंत्री शहा यांची भेट घेतली. त्या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराचेही ठरल्यानंतर आता मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातूनही भाजपच्या कोट्यातून महिला म्हणून आमदार देवयानी फरांदे यांनी संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. नाशिकमधून शिंदे गटाकडून पालकमंत्री दादा भुसे यांचा समावेश असला, तरी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनाही राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. कांदेंकडे आक्रमकता असल्यामुळे त्यांचा वापर पक्षवाढीसाठी शिंदे गटाकडून केला जाण्याची शक्यता आहे. जळगावमधून शिंदे गटाच्या कोट्यातून आमदार चिमणराव पाटील यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.