टोमॅटोचं किरकोळ बाजारात द्विशतक, केंद्राचं मोठं पाऊल; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार? नाफेडला आदेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 13, 2023

टोमॅटोचं किरकोळ बाजारात द्विशतक, केंद्राचं मोठं पाऊल; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार? नाफेडला आदेश

https://ift.tt/Eimhu6z
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : टोमॅटोच्या भाववाढीमुळे जेरीस आलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दिल्लीसह पाटणा, वाराणसी, कानपूर व कोलकाता येथील किरकोळ बाजारात किफायतशीर दरात विक्री करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या टोमॅटोची खरेदी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकमधून सहकारी संस्था ‘नाफेड’ आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघाकडून (एनसीसीएफ) करण्यात येणार आहे.मुसळधार पावसामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने देशातील अनेक भागांमध्ये किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर २०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये टोमॅटोचे उत्पादन कमी होतेच; शिवाय चालू महिन्यात वाहतुकीशी संबंधित अडचणींमुळेही दर वाढल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ज्या शहरांमध्ये किरकोळ बाजारातील किंमती गेल्या एका महिन्यात राष्ट्रीय सरासरीहून अधिक आहेत, अशा ठिकाणी कमी किंमतीत टोमॅटोचे वितरण केले जाईल, तसेच ज्या ठिकाणी टोमॅटोचा वापर जास्त आहे, अशा ठिकाणी वितरणासाठी प्राधान्य दिले जाईल, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले. दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना १४ जुलैपासूनच त्याचा लाभ मिळणार आहे.सध्या गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांमधील बाजारपेठेत होणारा टोमॅटोचा पुरवठा महाराष्ट्रातून विशेषत: सातारा, नारायणगाव आणि नाशिकमधून करण्यात येतो. हा पुरवठा या महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. आंध्र प्रदेशातील मदनपल्ले (चित्तूर) येथेही वाजवी प्रमाणात आवक सुरू आहे. दिल्ली आणि लगतच्या भागात प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातून टोमॅटोची आवक होते. याशिवाय टोमॅटो उत्पादनात दक्षिणेकडील राज्ये आघाडीवर आहेत. नाशिक जिल्ह्यातून लवकरच नवीन पीक येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात किंमती कमी होण्याची अपेक्षाही मंत्रालयाने व्यक्त केली आहे.दरम्यान, यंदा उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पिकामुळं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. मार्च एप्रिल महिन्यातील अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांना टोमॅटो काढून बांधावर फेकून द्यावी लागली होती. त्यावेळी दर देखील घटल्यानं टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावे लागले होते. आता चित्र बदललं असलं तरी फारच थोड्या शेतकऱ्याकंडे टोमॅटो आहेत.