वंध्यत्वाचे उपचार घेणाऱ्या दाम्पत्याची डॉक्टरवरच विनयभंगाची तक्रार, कोर्टाच्या निरीक्षणानंतर मोठा ट्विस्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 1, 2023

वंध्यत्वाचे उपचार घेणाऱ्या दाम्पत्याची डॉक्टरवरच विनयभंगाची तक्रार, कोर्टाच्या निरीक्षणानंतर मोठा ट्विस्ट

https://ift.tt/vB0PcR4
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: दाम्पत्याने 'आयव्हीएफ'चे उपचार घेऊन पैसे देण्यास टाळाटाळ करीत डॉक्टरांवरच विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. याबाबतची याचिका औरंगाबाद खंडपीठाने खारीज केली आहे. धनादेश वटलेले नसतानाही रुग्ण आणि नातेवाइकांनी हेतूपुरस्सर बदनामी केली, असे डॉ. राजेंद्र बोलधने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.मयूर कॉलनी येथील रहिवासी मोटे दाम्पत्याने डॉ. राजेंद्र बोलधने यांच्या 'जनरेशन नेक्स्ट टेस्ट ट्यूब बेबी सेंटर'मध्ये जून २०२२ मध्ये वंध्यत्वाचे उपचार घेतले होते. आयव्हीएफ प्रक्रिया झाल्यानंतर पैसे नसल्याचे सांगून रुग्णाच्या सासऱ्याने विनंती करून २० आणि २५ हजार रुपयांचे धनादेश जुलै २०२२ च्या तारखेचे दिले होते. संचालिका डॉ. शिल्पा बोलधने यांनी विनंती मान्य केली होती. मात्र, दोन्ही धनादेश बँकेत वटले नाहीत. या प्रकारानंतर सहा महिन्यांनी दाम्पत्य आणि सासऱ्याने जिन्सी पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली होती. याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली होती. खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय देशमुख आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्यासमोर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर खंडपीठाने याचिका खारीज केली. संबंधित रुग्णाने विनयभंगाबाबत पती किंवा सासऱ्यांना न सांगता सहा महिने उशिराने तक्रार करणे पटणारे नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. डॉ. राजेंद्र बोलधने यांच्या वतीने ॲड. संतोष भोसले यांनी बाजू मांडली.दरम्यान, मोटे दाम्पत्याच्या खोट्या तक्रारीमुळे समाजात बदनामी झाली आहे. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून आम्ही पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार आहोत, असे बोलधने यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला डॉ. शिल्पा बोलधने आणि ॲड. संतोष भोसले उपस्थित होते.