
रत्नागिरी : पनवेलमधून कोकणातील राजापूर येथे गणेशोत्सवासाठी आलेला एक युवक विसर्जन मिरवणुकीवेळी बुडाल्याने बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रायपाटण येथील बाजार वाडी या ठिकाणचा अक्षय दिलीप शेट्ये (वय वर्ष २३) हा तरुण गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी रायपाटण येथील अर्जुना नदीच्या पात्रात गेला होता. शेट्ये कुटुंब पनवेल येथून कोकणात आपल्या गावी आलो होते. बेपत्ता झालेला अक्षय हा मुंबई परिसरात खासगी कंपनीत कामाला आहे. गौरी गणपतीची विसर्जन मिरवणूक नदीवर सुरू असताना घोडकोंड (बाजारवाडी ) या नदीत अक्षय शेट्ये हा वाहत गेल्याची घटना आज सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. या घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, राजापूर तालुका पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कमलाकर तळेकर यांच्यासहित पाचल मंडळ अधिकारी संजय पवार तलाठी सतीश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गांगण, राजा नलावडे, मनोज गांगण, कुणाल गांगण, विकास कोलते परिसरातील स्थानिक नागरिक या तरुणाचा शोध घेत होते. रात्री उशिरा ही शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.दरम्यान, या बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध राजापूर पोलीस व स्थानिक ग्रामस्थ घेत असून उद्या सकाळ पुन्हा एकदा शोध मोहीम हाती घेतली जाणार आहे.