Weather News: राज्यात वादळी पावसाचा हंगाम, मात्र बहुतांश महाराष्ट्र हा रडारच्या 'रेंज'मधून बाहेर; कारण... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 24, 2023

Weather News: राज्यात वादळी पावसाचा हंगाम, मात्र बहुतांश महाराष्ट्र हा रडारच्या 'रेंज'मधून बाहेर; कारण...

https://ift.tt/qzh3jgZ
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात सर्वत्र वादळी पावसाचा हंगाम सुरू झालेला असताना, बहुतांश महाराष्ट्र हा रडारच्या 'रेंज'मधून बाहेर असल्याची स्थिती आहे. मुंबई आणि सोलापूरचे रडार सध्या बंद असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी अतिवृष्टीचे नेमके इशारे देणे हवामानशास्त्रज्ञांसाठी कठीण बनले आहे.नागपूरमध्ये शनिवारी पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश पावसानंतर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दिवसभरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी पाऊस आणि अतिवृष्टीसाठी कारणीभूत असलेल्या ढगांची अचूक माहिती मिळवण्यासाठी डॉप्लर रडार अत्यंत उपयुक्त असते. मात्र, मुंबईचे रडार बंद असल्याने कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आणि सोलापूरचे रडार बंद असल्याने दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमधील ढगांची नेमकी स्थिती समजणे सध्या शक्य होत नाही. याबाबत हवामान अभ्यासक डॉ. विनीत कुमार सिंह म्हणाले, 'डॉप्लर रडारमुळे ढगांची उंची, त्यांच्यामधील पाण्याचे प्रमाण, ढगांचे नेमके स्थान आणि हालचाल अशी अनेक प्रकारची माहिती मिळत असल्याने शहराच्या कोणत्या भागावर किती वेळ आणि किती प्रमाणात पाऊस होऊ शकतो हे काही वेळ आधीच सांगता येऊ शकते. आपत्ती व्यवस्थापनासाठी डॉप्लर रडार अत्यंत उपयुक्त ठरतात. मात्र, सध्या मुंबई आणि सोलापूरचे रडार उपलब्ध नसल्याने नेमका अंदाज देणे शक्य होत नाही.'नागपूरमध्ये शनिवारी पहाटे अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, उंच ढगांची निर्मिती होत असल्याचे नागपूरच्या रडारवर दिसत असूनही भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) या अतिवृष्टीचा कोणताही इशारा जारी केला नाही. याआधी २५ सप्टेंबर २०१९ ला पुण्यात झालेल्या ढगफुटीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर मोठ्या शहरांसाठी रडारच्या साह्याने निरीक्षण करून पुढील काही तासांचे इशारे देण्यात येतील, असे आयएमडीने जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र, ऐन पावसाच्या हंगामात रडार बंद पडत असल्यामुळे ती घोषणा फक्त कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.रडार बंद असले, तरी आम्ही उपलब्ध यंत्रणांच्या साह्याने अचूक अंदाज देत आहोत. रडारवर इतका खर्च का करण्यात येतो हा मलाही पडलेला प्रश्न आहे.- डॉ. अनुपम कश्यपी, हवामान शास्त्रज्ञ, आयएमडी, पुणेरडार सक्रिय होण्याची शक्यता कमीमुंबईच्या रडारचे काही भाग निकामी झाल्यामुळे नऊ सप्टेंबरपासून हे रडार कार्यरत नाही. पुण्यातील 'आयआयटीएम'ने सोलापूर येथे बसवलेले रडार १९ ऑगस्टपासून कार्यरत नाही. मुंबईच्या रडारचे भाग लगेच उपलब्ध होण्याची शक्यता कमी असून, चालू हंगामात हे रडार सक्रिय होण्याची शक्यता कमी असल्याचे, 'आयएमडी'मधील सूत्रांनी सांगितले.