
मुंबई : सुमारे आठवडाभरापूर्वी शेअर बाजाराने दिवसभर सतत वाढीसह १६ वर्षांचा उच्चांक मोडला होता. २००७ नंतर शेअर बाजारात एवढी मोठी वाढ दिसून आली, जी गेल्या तीन दिवसांत १६०० हून अधिक अंकांनी धुवून निघाली. गेल्या आठवड्यात सलग ११ दिवस बाजारात तुफान तेजी होती मात्र, या आठवड्यात बाजारात भयान मंदी दिसून येत असून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अवघ्या तीन दिवसांत १६०० अंकांनी घसरला आहे. यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांना अंदाजे ५.४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.कोणत्या दिवशी किती घसरणसेन्सेक्स सोमवारी २४२ अंकांनी बुधवारी ७९६ अंक आणि गुरुवारी ५७० अंकांपेक्षा अधिक घसरला, ज्यामुळे या आठवड्यात एकूण तोटा १६०८ अंकांचा झाला. गणेश चतुर्थी सणानिमित्त मंगळवारी बाजारपेठ बंद राहिली. दरम्यान, बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे बाजार भांडवलही ३१८ लाख कोटी रुपयांवर घसरले मात्र, बाजारात ही घसरण होण्यामागचे नक्की कारणं काय काय आहेत ते पाहू...फेड रिझर्व्हचा निर्णयबाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे यूएस फेडरल रिझर्व्हचे भविष्यासाठी दिलेले संकेत होय. या बैठकीत फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले नसले तरी यावर्षी पुढे वाढ करण्याचे संकेत नक्कीच दिले आहेत. फेडरल रिझर्व्हचा अंदाज आहे की या वर्षी दर ०.२५% आणि २०२४ मध्ये ०.५० टक्क्यांनी कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मंदीची भीती व्यक्त करत शेअर्सची विक्री केली. अमेरिकेत महागाई अजूनही जास्त आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यूएस फेड सातत्याने व्याजदर वाढवत आहे. मात्र यामुळे अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता आहे.बाँड यिल्ड आणि डॉलरदोन वर्षांच्या यूएस ट्रेझरी नोट्सवरील यील्ड १७ वर्षांच्या उच्चांकावर म्हणजेच ५.१९७० टक्क्यांवर पोहोचले. तर १० वर्षांचे यील्ड ४.४३१० टक्क्यांपर्यंत वाढले आणि ही बाब इक्विटी किमतींसाठी हे नकारात्मक आहे. त्याच वेळी, डॉलर निर्देशांकाच्या मजबूतीमुळे भारतातही विक्री वाढली आहे. गुरुवारी डॉलर निर्देशांक १०५.५९ वर वाढला.कच्च्या तेलाच्या किमतीजागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे विशिष्ट प्रकारच्या गुंतवणूकदारांचा ताण वाढला आहे. विश्लेषकांचा अंदाज आहे की कच्च्या तेलाचे दर लवकरच प्रति बॅरल १०० डॉलरच्या पातळीला स्पर्श करू शकतात. मजबूत डॉलरमुळे भारताला आयात कराव्या लागणाऱ्या वस्तू आणि सेवा महागतात.प्रॉफिट बुकींगगेल्या अनेक दिवसांच्या तेजीनंतर आता मार्केट प्रॉफिट बुकींगच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. गुंतवणूकदारांनी ज्या शेअर्सवर पैज लावली त्यावर नफा कमावल्यानंतर त्यातून आता बाहेर पडत आहेत. तसेच, सलग सहा महिने भारतीय शेअर्सवर पैसे खर्च केल्यानंतर परकीय संस्थात्मक गुंतवणूक (FII) सप्टेंबरमध्ये विक्रीच्या मूडमध्ये आहेत. आकडेवारी दर्शवते की सप्टेंबर महिन्यात एफआयआयने आतापर्यंत ५,२१३ कोटी रुपयांची विक्री केली आहे.