
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : ओबीसींतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, यासह समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या ११व्या दिवशी, गुरुवारी टोंगे यांची प्रकृती खालावली. त्यांची प्रकृती चिंताजनक असतानाही सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, आज, शुक्रवारी दुपारी १२ वाजता चंद्रपूरच्या मातोश्री सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघ, सर्व ओबीसी संघटना आणि जात संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरविली जाणार आहे.चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोंगे यांनी ११ सप्टेंबरला अन्नत्याग आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या समर्थनात विदर्भात ओबीसी संघटनांनी महामोर्चे काढले. सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप झाल्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टोंगे यांची भेट घेऊन मागण्यांवर चर्चा केली. यातून अपेक्षित तोडगा न निघाल्याने आंदोलन अजूनही कायम आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास टोंगे यांना अस्वस्थ वाटू लागले. याविषयीची माहिती मिळताच तत्काळ डॉक्टरांनी उपोषण मंडप गाठला. त्यांच्या तपासण्या करून सलाइन लावले. यानंतर दिवसभरात दोनदा आणि रात्रीही तपासण्या केल्या. सरकारकडून तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलक संतापले. त्यांनी मुंडण आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदविला. यासोबतच चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले. यवतमाळात घंटानाद करीत मागण्यांचा ओबीसी समाजबांधवांनी जागर केला.आंदोलनावर लवकरच तोडगाओबीसींच्या आंदोलनाच्या अनुषंगाने विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. यात मुख्यमंत्र्यांनी आंदोलनावर लवकरच तोडगा काढणार, अशी ग्वाही दिली आहे. ‘ओबीसींचे आंदोलन संपविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. स्वत: किंवा आपला प्रतिनिधी पाठवून आंदोलकांशी चर्चा करावी. ११ दिवसांपासून रवींद्र टोंगे हे चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. त्यांची त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांना मागण्यापूर्तीचा विश्वास तरी किमान द्यावा, याकडेही वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.