
कोलंबो : पाकिस्तानचे आठ विकेट्स पडले आणि पंचांनी भारत सामना जिंकल्याचे जाहीर केले. त्यावेळी बऱ्याच चाहत्यांन धक्का बसला. कारण आठ विकेट्सनंतर पाकिस्तान ऑलआऊट कसा झाला, त्यांचे दोन फलंदाज गेले तरी कुठे असे प्रश्न चाहत्यांना पडायला लागले. पण त्यानंतर काही वेळाने या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली.कुलदीप यादवने आपली पाचवी विकेट मिळवली आणि जोरदार सेलिब्रेशन केले. त्यानंतर मैदानातील पंचांनी भारत सामना जिंकल्याचे जाहीर केले. कारण आठ विकेट पडल्यानंतर पाकिस्तानने हार पत्करली होती. या सामन्यात आजच्या दिवशी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. तो गोलंदाजीला पण आला नाही. त्यामुळे तो फलंदाजीलाही येऊ शकला नाही. पाकिस्तानचा दुसरा वेगवान गोलंदाज नसीम शहादेखील दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही. ही गोष्ट पाकिस्तानने पंचांना कळवली होती आणि त्यामुळेच पाकिस्तानच्या आठ विकेट्स गेल्यावर त्यांनी भारताला विजयी घोषित केले.पाकिस्तानची गोलंदाजी आशिया कप वन-डे क्रिकेट स्पर्धेतील सर्वोत्तम मानली जात होती; पण भारतीय फलंदाजी बहरल्यावर ती किरकोळ झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘सुपर फोर’ लढतीच्या राखीव दिवशी जोरदार पाऊस अपेक्षित होता, प्रत्यक्षात विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या आक्रमक शतकांनी धावांचा वर्षावच प्रेमदासा स्टेडियमवर केला. त्यामुळे भारताने पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात २ बाद ३५६ एवढी भक्कम धावसंख्या उभारली. विराटने ९४ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद १२२ धावांची, तर राहुलने १०६ चेंडूंत बारा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद १११ धावांची खेळी केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने भारतीय डावाचा भक्कम पाया रचताना पाकिस्तानच्या गोलंदाजांना स्थिरावू दिले नव्हते. रविवारी पावसाने व्यत्यय आणला त्यापूर्वी काही षटकेच विराट आणि राहुल मैदानात आले होते. तब्बल २४ तासांच्या व्यत्ययानंतर पुन्हा फलंदाजीस येताना दोघांनी सकारात्मक फलंदाजी केली; तसेच त्यांनी डावाची चांगली आखणीही केली. दोघांनी बदली गोलंदाजांविरुद्ध हल्ला सुरू करीत मोठ्या खेळी साकारल्या. त्यांनी ३२.१ षटकांत २३३ धावांची विक्रमी भागीदारी केली.राहुलने छान शतकी खेळी करून आपले वन-डे पुनरागमन जोशात साजरे केले. दुखापतीचा आपल्या फलंदाजीवर परिणाम झाला नसल्याचे त्याने दाखवून दिले. विराट कोहलीने पुन्हा आपला मास्टरक्लास दाखवला. त्याने धावा घेण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या आणि त्या साधल्याही. त्याची धावा घेण्याची चपळाई जबरदस्त होती. त्याने जवळपास १३०च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, यावरुनच सर्व लक्षात येते. यामुळे भारतीयांनी सोमवारी २५.५ षटकांत २०९ धावा वसूल केल्या. भारतीयांनी एकूण ३४ चौकार आणि नऊ षटकारांची आतषबाजी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांवर भारतीय फलंदाजही वर्चस्व राखू शकतात, हे दाखवून दिले.