सातारा : जलमंदिर परिसरातील बाजीराव विहीर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुरातन विहिरीचे छायाचित्र राष्ट्रीय पोस्ट दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याने पोस्टकार्डवर छापण्यास ११ ऑक्टोबर पासून सुरुवात केली आहे. बाजीराव विहिरीचे छायाचित्र येथून पुढे छापण्यात येणाऱ्या पोस्टकार्डवर असणार आहे. ही अत्यंत अभिमानास्पद व सातारच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून सन्मानीय घटना आहे. एमआयटी स्कूल ऑफ आर्किटक्चर पुणे यांनी रोहन काळे, राजेश कानिक यांनी अनेकांच्या सहकार्याने, शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करुन परिश्रमपूर्वक दिलेल्या योगदानाचे निश्चितच कौतुक आहे, असे खासदार यांनी म्हटलं आहे. सातारा शहर ऐतिहासिक शहर आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याची राजधानी रायगडावरून किल्ले अजिंक्यतारा येथे स्थापन केली. स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून असलेल्या किल्ले अजिंक्यतारावरूनच छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात अटकेपार झेंडा फडकवला गेला. त्यांच्याच काळात सध्याच्या जलमंदिर पॅलेसचा भाग असणारी आणि बाजीराव विहिर म्हणून ओळखली जाणारी विहिर बांधण्यात आली होती. ही बाजीराव विहिर १०० फूट खोल आहे, तर हीचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा आकार आहे. या विहिरीस ९ कमानी आहेत, तसेच या विहिरीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचे दगडामध्ये राजचिन्हांसह शिल्प कोरण्यात आलेले आहे. या विहिरीमध्ये आजही जिवंत पाण्याचे झरे आहेत. पूर्वी ज्यावेळी कास योजना किंवा खापरी योजना अस्तित्वात नव्हती, त्यावेळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या याच बाजीराव विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत होते.भारतीय पोस्ट खात्यातर्फे भारतातील उल्लेखनिय स्टेपवेल्सचे निरीक्षण करून, त्यातील बारव, बावडी, पुष्करणी, पोखरण, पायविहिर, घोडेबाव, पोखरबाव, अश्या वेगवेगळ्या स्टेपवेलमधून राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त महाराष्ट्रातील आठ स्टेपवेलच्या छायाचित्राचा समावेश त्याच्या पुस्तिकात करण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिक, अमरावती, पुणे व सातारा जिल्ह्यातील प्रत्येक एका स्टेपवेलचा समावेश आहे. तर, परभणी जिल्ह्यातील चार स्टेपवेल अशा एकूण आठ स्टेपवेलचा समावेश यंदा होऊ शकला आहे. त्यामध्ये सातारच्या बाजीराव विहिरीच्या छायाचित्र पोस्टकार्डवर प्रसिद्ध झाले आहे. या बाजीराव विहिरीला साताराच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून ही एक असामान्य व अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सातारा शहराच्या दृष्टीनेही ही एक अभिमानास्पद बाब आहे. बाजीराव विहिरीचे छायाचित्र प्रसिद्ध होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र बारव संवर्धन समितीचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे, राजेश कानिम, शैलेश करंदीकर, धनंजय अवसरे, हेमंत लंगडे यांनी बहुमोल सहकार्य केले आहे. उदयनारजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजेभोसले यांच्या मार्गदर्शनाखाली याच व्यक्तींच्या पुढाकाराने सातारा वारसा संवर्धन ग्रुप समितीच्या माध्यमातून बाजीराव विहिरीची स्वच्छता जपली जाते. शिवरात्री आणि शिवजयंतीच्या रात्री विहिरीमधील पायऱ्या, कमानी आणि अन्य ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येत असतो. विहिरीच्या पोस्टकार्डवरील छाचाचित्राची प्रसिद्धी होणे ही निश्चितच प्रत्येक सातारकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमूद केले आहे.Read Latest And