मुंबई-गोवा महामार्ग अपघात; जखमी संकेशची मृत्युशी झुंज अपयशी, महाडिक कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 18, 2023

मुंबई-गोवा महामार्ग अपघात; जखमी संकेशची मृत्युशी झुंज अपयशी, महाडिक कुटुंबावर दुःखाचा डोंगर

https://ift.tt/2D3FYJR
रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. चिपळूण शहरात पॉवर हाऊसजवळ लोकमान्य टिळक चौकात याआधीही अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये आजवर दुर्दैवाने दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. असाच एक दुर्दैवी अपघात ८ ऑक्टोबर रोजी रविवारी रात्रीच्या सुमारास झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा कराड येथे उपचार सुरू असताना दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. संकेश सिताराम महाडिक (वय वर्ष २५) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. महाडिक कुटुंबातला कर्ता असलेला युवक या अपघातात गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.चिपळूण शहरात एका कापडाच्या दुकानात कामाला होता. धामापूर येथे गावात एक मयत झाल्याने तो रजेवरती होता रविवारी रात्री धामापूर येथून चिपळूण येथे आपल्या बहिणीकडे येत असताना चिपळूण शहरात रात्री आठच्या सुमारास पॉवर हाऊसजवळ त्याच्या दुचाकीला मोठा अपघात झाला. यात संकेशला गंभीरित्या दुखापत झाली होती. त्याला तातडीने चिपळूण येथील प्राथमिक उपचारानंतर कराड येथे हलविण्यात आले होते. कराड येथे एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा सोमवारी संध्याकाळी उशिरा मृत्यू झाला. या अपघाती मृत्यूची नोंद कराड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. संकेशच्या वडिलांचेही काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी संकेश याच्यावरती होती. तो काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. संकेश याच्या पश्चात आई, दोन बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे. चिपळूण येथील माजी नगरसेवक अरुण भोजने यांच्याकडे असलेल्या संकेश महाडिक या युवकाचे अपघाताचे वृत्त कळताच चिपळूण येथील ज्येष्ठ व्यापारी व माजी नगरसेवक अरुण भोजने यांनी महाडिक कुटुंबाला मोठी मदत केली. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंता यांना महामार्गावर अपघाताचे ठिकाण ठरलेल्या परिसरात दुरुस्ती करण्यास सांगितले. यापूर्वी या ठिकाणी दोन जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे ठिकाणी काम करण्याची सूचना केली होती. मात्र, अद्याप या ठिकाणी कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही अशी, प्रतिक्रिया अरुण भोजने यांनी दिली आहे. चिपळूण शहरातील बहादुर शेख नाका येथील बांधकाम सुरू असतानाच यंत्रसामग्रीसह फुल कोसळल्याने महामार्गाच्या कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच महामार्गावर चिपळूण शहरातील पॉवर हाऊस परिसरात यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. हा महामार्ग अजून किती जणांचे बळी घेणार आहे, असा संतप्त सवाल चिपळूण येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.