म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील गणेशोत्सवात आकर्षणाचे केंद्र असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी यंदाही मोठ्या प्रमाणात दान केले होते. यामध्ये सोन्याचांदीच्या दागिन्यांचाही समावेश होता. या दानाचा रविवारी लिलाव करण्यात आला आहे. या लिलावात अनेकांनी बोली लावली. चांदीची श्री गणेशमूर्ती, मूषक, गदा, श्रीफळ, चांदीचे ताम्हन, ग्लास, केळीचा घड, पाळणा, मुकुट, हार, नाणी, सोन्याचा हार, कडं, साखळी आदी दागिन्यांचा यात समावेश होता. यंदा भाविकांनी साडेतीन किलो सोने व ६४ किलो चांदी अर्पण केल्याचे दिसून आले.२०२१मध्ये तत्कालीन निर्बंधांमुळे शासनाच्या नियमांचे पालन करून चार फूट उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या मूर्तीसाठी मंडळाने चांदीचे दागिने केले होते. या दागिन्यांना सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. या दागिन्यांचा लिलाव यंदा करण्यात आला. तीन लाख ६९ हजार रुपयांच्या बोलीत बाजूबंद, कडं, सोनपट्टा, हार, भिकबाळी आणि अंगठी आदी दागिने भाविकांनी खरेदी केले, अशी माहिती या मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळी यांनी सांगितले.या लिलावाशिवाय लालबागच्या राजाच्या चरणी ५ कोटींहून अधिक रोख रक्कम दान करण्यात आली. शनिवारपर्यंतच्या मोजणीनुसार तब्बल ५ कोटी १६ लाख ८५ हजार रुपये रक्कम भाविकांनी दानपेटीत अर्पण केली असल्याची माहिती मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी दिली. पुढील आणखी काही दिवस दानपेटीतील रकमेची मोजणी सुरू राहणार आहे, अशी माहिती पदाधिकारी नाना वेदक यांनी दिली.भाविकांनी यंदा सुमारे साडेतीन किलो सोने आणि ६४ किलो चांदी अर्पण केलेली आहे. हे दान व लिलावातील रक्कम लोकोपयोगी आणि समाजकार्यासाठी वापरण्यात येईल. समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी उत्सव मंडळ बांधील आहे, असे या मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले.
https://ift.tt/cerh5wl