छत्रपती संभाजीनगर : चवदार खवा व पेढे निर्मितीसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या धाराशीव जिल्ह्यातील भूम येथे सौरऊर्जेवर खवा निर्मितीचा पहिला प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. राज्यात अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. वृक्षतोडीला पर्याय असलेला हा सौरऊर्जा प्रकल्प भविष्यकालीन वाटचालीसाठी फायदेशीर ठरणार आहे.धाराशीव जिल्ह्यातील भूम, सरमकुंडी, वाशी परिसरातील शेकडो गावांमध्ये खवा निर्मिती केली जाते. परिसरात साधारणपणे २५०हून अधिक खवाभट्ट्या आहेत. भूम एमआयडीसीमध्ये खवा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या खवाभट्ट्यांसाठी पाच लाख वृक्षतोड होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळून दर्जेदार खवानिर्मिती करण्यासाठी उद्योजक विनोद जोगदंड यांनी सोलरवर चालणारी खवाभट्टी उभारण्याचे ठरविले. त्यादृष्टीने त्यांनी अभ्यास केला आणि वीस भट्ट्यांचा प्रकल्प उभारला. सर्वसाधारण गणितानुसार लाकडाच्या मदतीने एक किलो खवा निर्मितीसाठी २० ते २५ रुपये लागतात. गॅसवर ५०; तर डिझेलवर खवानिर्मितीसाठी ६० रुपये खर्च येतो. विनोद जोगदंड यांनी सौरऊर्जेचा उपयोग करून खवानिर्मिती केली त्यामुळे वीस भट्ट्या हाताळण्यासाठी दोन व्यक्तींची मदत पुरेशी होते आणि खर्चही २० रुपयांच्या आसपास लागतो, असे समोर आले. सद्यस्थितीत भूम एमआयडीसीतील खवानिर्मिती केंद्रात २० मशीन चालतात, त्याला २५ किलोवॉट वीज लागते. एका मशीनमध्ये ४० लिटर दूध गोठवले जाते. त्यापासून आठ किलो खवा तयार होतो. एक शिफ्टमध्ये रोज ६०० किलो खवा तयार होतो. गेल्या महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित झाला. भूम, वाशी परिसरातून दररोज २५ टन खवा तयार होतो. सौर प्रकल्पाचा वापर असलेल्या उद्योगाचा शेतकरी दूध उत्पादक संघाला अधिकाधिक फायदा व्हावा या दृष्टीने जोगदंड यांचे प्रयत्न सुरू आहेत. उत्पादन झालेला खवा जळकट, खरबड न राहता चांगल्या दर्जाचा राहतो. शिवाय त्यात भेसळ करता येत नाही. विनोद जोगदंड यांच्या इंद्रायणी खवा उद्योगामध्ये तयार झालेला शुद्ध दुधाचा खवा मिठाईसाठी तयार होत आहे.सौरऊर्जेवर खवानिर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला. शेतकरी व खवा उत्पादन करणाऱ्या सर्वांना याचा फायदा व्हावा, असा यामागील हेतू आहे. दोन वर्षांत आमच्या जिल्ह्यात सौरऊर्जेद्वारे खवानिर्मिती व्हावी असा आमचा प्रयत्न आहे.- विनोद जोगदंड,खवा उत्पादक, भूम
https://ift.tt/I61PJ8R